
पठाण चित्रपटामध्ये शाहरूख खान असल्याने पूर्वीपासून या चित्रपटाला विरोध केला जात होता. या चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर या विरोधाला आणखी धार चढली आहे. या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण ही केशरी रंगाच्या बिकीनीमध्ये दाखवण्यात आली आहे. यावर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या चित्रपटावर बहिष्कार घाला आमिर खानप्रमाणेच शाहरूख खान यालाही धडा शिकवा असं कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांचे म्हणणे आहे. उजव्या विचारसरणीच्या लोकांप्रमाणेच काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनीही बेशरम रंग या गाण्याला विरोध केला आहे. आंध्र प्रदेशातील कम्युनिस्ट पक्षाचे नेते चिगुरुपती बाबू राव यांनी बेशरम रंग गाण्यावर टीका केली. पठाण चित्रपट पाहण्यापेक्षा भुकेल्यांना अन्न द्या असे राव यांनी म्हटले आहे.
पठाण चित्रपट प्रदर्शित केल्यास थिएटर जाळून टाका!
अयोध्येतील महंत राजू दास यांनी शाहरूख खान आणि दिपीका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. महंत दास यांनी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे की ज्या चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवला जाईल त्या चित्रपटगृहाला आग लावून जाळून टाका. महंत दास यांनी आरोप केला आहे की बॉलीवूड आणि शाहरूख खान या दोघांनी सातत्याने सनातन धर्माची खिल्ली उडवत अपमान करण्याचे काम केले आहे.
बॉलीवूड आणि हॉलीवूड हे सातत्याने सनातन धर्माचा अपमान करत असून ते हिंदू देवी-देवता यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पठाण चित्रपटात दीपिका पदुकोण हिने भगव्या रंगाची बिकीनी घालत साधू-संतांचा आणि भगव्या रंगाचा अपमान केल्याचे महंत दास यांचे म्हणणे आहे.
दास यांनी आपली नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की भगव्या रंगाची बिकीनी घालण्याची आणि नग्नतेचं प्रदर्शन करण्याची गरजच काय होती ? या लोकांविरोधात कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी दास यांनी केली आहे. जर ही मंडळी ऐकली नाही आणि त्यांनी चित्रपट प्रदर्शित केला तर प्रेक्षकांनी जिथे हा चित्रपट प्रदर्शित होईल ते थिएटर जाळून टाकावं.

























































