
सामना ऑनलाईन, नॉटिंगहॅम
सलामीच्या लढतीत वेस्ट इंडीजकडून दारुण पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तानने सोमवारी वर्ल्ड कप जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या यजमान इंग्लंडला 14 धावांनी पराभवाचा ‘शॉक’ देत झोकात पुनरागमन केले. या विजयामुळे त्यांची पराभवाची मालिकाही खंडित झाली.मोहम्मद हाफीजची अष्टपैलू चमक, कर्णधार सर्फराज अहमद, बाबर आझम यांची दमदार अर्धशतके आणि मोहम्मद आमीर, वाहब रियाझ, शादाब खान यांनी महत्त्वाच्या क्षणी बाद केलेले फलंदाज याच जोरावर पाकिस्तानने विजय मिळवला. 349 धावांचा पाठलाग करताना जो रूट (107) व जोस बटलर (103) यांनी दिलेली शतकी झुंज अपयशी ठरली.
इंग्लंडने वर्ल्ड कपआधी झालेल्या वन डे मालिकेत पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. मात्र या लढतीत त्यांना या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. पाकिस्तानकडून मिळालेल्या 349 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांना यश लाभले नाही. जो रूट व जोस बटलर यांनी पाचव्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी करताना विजयाची आस दाखवली. पण शादाब खानने जो रूटला आणि मोहम्मद आमीरने जोस बटलरला बाद करीत सामन्याला कलाटणी दिली. जो रूटने आपल्या खेळीला एक षटकार व दहा चौकारांचा साज चढवला, तर जोस बटलरने दोन षटकार व नऊ चौकारांची आतषबाजी केली. पाकिस्तानकडून वाहब रियाझने तीन, मोहम्मद आमीर व शादाब खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
धावफलक
पाकिस्तान- इमाम उल-हक झे. वोक्स गो. अली 44, फखर झमान यष्टिचीत बटलर गो. अली 36, बाबर आझम झे. वोक्स गो. अली 63, मोहम्मद हाफीज झे. वोक्स गो. वुड 84, सर्फराज अहमद झे. गो. वोक्स 55, असीफ अली झे. बेयरस्टो गो. वुड 14, शोएब मलिक झे. मॉर्गन गो. वोक्स 8, हसन अली नाबाद 10, शाबाद खान नाबाद 10 ,अवांतर- 20, एकूण- 8 बाद 348 धावा
गोलंदाजी- ख्रिस वोक्स 8-1-71-3, मोईन अली 10-0-50-3, मार्क वुड 10-0-53-2 इंग्लंड- जो रूट झे. हाफीज गो. शादाब 107, जोस बटलर झे. वाहब गो. आमीर 103 अवांतर- 8, एकूण – 9 बाद 334 गोलंदाजी- वाहब 10-0-82-3, आमीर 10-0-67-2, शादाब 10-0-63-2
दरम्यान, याआधी सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात दिल्यानंतर बाबर आझम (63), मोहम्मद हाफीज (84) व कर्णधार सर्फराज अहमद (55 धावा)यांनी शानदार अर्धशतके झळकावत इंग्लंडची गोलंदाजी निप्रभ ठरवली. बाबर आझमने 66 चेंडूंत चार चौकारांसह एक षटकार लगावला. हाफीजने84 धावांच्या खेळीत 62 चेंडूंना सामोरे जाताना 8 सणसणीत चौकारांसह 2 षटकार ठोकले. मार्क वुडने वोक्सकरवी झेलबाद करून हाफीजचा झंझावात थांबवला. कर्णधार सर्फराज अहमदनेही 44 चेंडूंत 5 चौकारांसह 55 धावांची खेळी केल्याने पाकिस्तानला सवातीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडकडून मोईन अली व ख्रिस वोक्स यांनी 3-3 फलंदाज बाद केले, तर मार्क वुडला 2 बळी मिळाले. विजयी संघ -पाकिस्तान


























































