
सामना ऑनलाईन, नॉटिंगहॅम
14 जुलै रोजी यंदाचा विश्वचषक हाती घेऊन देशासाठी आणि 136 कोटी देशवासीयांसाठी उंचावण्याचे माझे मोठे स्वप्न आहे . आजही जेव्हा मी 2011 वर्ल्ड कपची आठवण काढतो तेव्हा अंगावर काटा येतो. 2019 वर्ल्ड कपमध्ये देशासाठी खेळण्याचे स्वप्न मी पाहिले होते. ते सत्यात उतरलेय. आता देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न साकारण्यासाठी काय पण करण्याची माझी तयारी आहे, असे ट्विट टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांडय़ाने आयसीसीच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहे.
संघासाठी खेळणे हेच आयुष्य
‘हिंदुस्थानी संघासाठी खेळणे हेच माझे सर्वस्व आहे, हेच माझं आयुष्य आहे. मी एक असा खेळाडू आहे ज्याचं त्याच्या खेळावर प्रचंड प्रेम आहे. चिकाटीने खेळायला आणि नवनवीन आव्हाने स्वीकारायला मला आवडते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मी या वर्ल्ड कपसाठी तयारी करीत असून आता माझ्या स्वप्नपूर्तीची ती वेळ आली आहे’, असे हार्दिक पांडय़ाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.



























































