
द्वारकानाथ संझगिरी
सध्या फॉर्म, परफॉर्मन्स, अनुभव, प्रेक्षकांचा पाठिंबा, गुणवत्ता, स्वतःचं अंगण आणि हिंदुस्थानी खेळपट्टय़ांवरची इतर संघांची ताकद वगैरेचा विचार केला तर हिंदुस्थानी संघ वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वात अपेक्षित संघ ठरतो. नंबर वन दावेदार तोच आहे.
पण क्रिकेटमध्ये दोन अधिक दोन चार असं घडतंच असं नाही. रामाचा अश्वमेधाचा घोडा लव-कुश थोपवू शकतात.
सुरुवातीला मी माझं एक मत व्यक्त केलं होतं की हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीत येतील. अनेकांनी हेच मत व्यक्त केलं होतं. कारण लॉजिक तसं सांगत होतं. पण क्रिकेटची गाडी लॉजिकच्या रुळावरून सरळ जातेच असं नाही. कधीतरी असा सांधा बदलतो की, कर्जतला जाणारी गाडी कसाऱयाला जाते. इंग्लंडचे अफगाणिस्तानने काय केले ते आपण पाहिलंय. तो धक्का पचवायच्या आत नेदरलॅण्ड्सने फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेला ‘अकरा मुंडय़ा चीत केलं.’ क्रिकेटमध्ये हे घडतं. क्रिकेटमध्ये लिंबूटिंबू संघ अधिक खतरनाक असतात. ते दिवाळीतल्या ‘चिडी’ या फटाक्यासारखे असतात. चिडी पेटवली की, आपण ठरवलेल्या मार्गानेच जाते असे नाही. ती उलटी आपल्या अंगावर येऊ शकते. नेदरलॅण्ड्स नावाची चिडी परवा दक्षिण आफ्रिकेच्या अंगावर गेली. मुख्य म्हणजे, तिने अचानक वळण घेतलं. फलंदाजी करताना त्यांची अवस्था 5 बाद 82 होती. म्हणजे दक्षिण आफ्रिकेची चिडी अपेक्षेप्रमाणे विजयाच्या दिशेने निघाली होती. ती अचानक डच कर्णधार स्कॉट एडवर्डस्ने 79 धावांची खेळी करून वळवली. त्याला दोन छोटय़ा आक्रमक खेळींची साथ मिळाली. बरं, डच वेगवान गोलंदाज म्हणजे सुसाटलेलं वारं नाही, पण फसवी झुळुक नक्की होती. काही चांगले चेंडू, विशेषतः मिलरला पडलेला चेंडू, पडलेल्या विकेट्स आणि मग मनाने ढासळत जाणं यामुळे दक्षिण आफ्रिकेचे घालीन लोटांगण कधी सुरू झालं कळलं नाही. डच संघावर मंत्रपुष्पांजलीनंतर उधळण्यासाठी हातात फुलं आली तेव्हा कळलं, इतिहास घडला.
डच 19व्या शतकापासून क्रिकेट खेळतात. नेपोलियनशी लढण्यासाठी ब्रिटिश सैन्य तिथे आलं तेव्हा ते शस्त्रांबरोबर बॅट- बॉल घेऊन आले. पण आज तिथे फक्त 6000 माणसं क्रिकेट खेळतात. नेदरलॅण्ड्स उंच स्त्र्ाया, पवनचक्क्या, समुद्रसपाटीखालचा देश, चीज, लोणी यासाठी प्रसिद्ध आहे. खेळ म्हटलं की, फुटबॉल आणि हॉकी डोळय़ासमोर उभं राहतो, क्रिकेट नाही. तरी तो खोलवर मूळ असलेल्या दक्षिण आफ्रिकेला हरवतो. गेल्या वर्षी टी-20तही त्यांनी हरवलं होतं. त्यामुळे कुणीही कुणाला ‘बाळ’ समजू नये. हे सर्व बाळकृष्ण आहेत. कधी कुणाचं कालियामर्दन होईल सांगता येत नाही. माझी खात्री आहे, सध्या भीमासारखा ताकदवान असलेला हिंदुस्थानी संघ बांगलादेशला ‘पुरुषच’ समजेल. मारुतीने भीमाचं केलेलं गर्वहरण आपण विसरणार नाही.
अर्थात, एक-दोन बदल संघात व्हावेत. शमीला संधी द्या. अजून बरेच सामने आहेत. त्याला मॅचचा सराव मिळूद्यात. तो अलीकडे हिंदुस्थानी संघात ‘पेईंग गेस्ट’ झालाय. एखादा वेगवान गोलंदाज जायबंदी झाला तर त्याला संधी मिळेल. पण अचानक महत्त्वाच्या सामन्यात खेळण्यापेक्षा आधी सराव असलेला बरा. कारण मॅच प्रॅक्टिस ही मॅच प्रॅक्टिस असते. आणि सिराजला विश्रांती द्यायची नसेल तर शार्दुलऐवजी शमी घ्या. आपले फलंदाज एवढे फॉर्मात असताना एका अधिक फलंदाजाचं कवच पुंडल हवंय का? गिलला मोठी खेळी खेळता आली तर मजा येईल. आपल्याला पाहायला आणि त्याला डेंग्यूनंतर आत्मविश्वास मिळायला. क्रिकेटच्या मैदानावर शेजारधर्म नसतो. पाकिस्तानला आपण दाखवला नाही. यांनाही नको.

























































