Cricket World Cup 2023 न्यूझीलंडचा सलग विजय, दुबळय़ा नेदरलॅण्ड्सला 99 धावांनी हरविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्घाटनाच्या लढतीत जगज्जेत्या इंग्लंडचा पाडाव करणाऱया न्यूझीलंडने नेदरलॅण्ड्सला 99 धावांनी धूळ चारून आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरा विजय मिळविला. मिचेल सॅण्टनरची अफलातून अष्टपैलू कामगिरी आणि विल यंग (70), रचिन रवींद्र (51) व कर्णधार टॉम लॅथम (53) यांची अर्धशतके ही किवींच्या डावाची मुख्य वैशिष्टय़े ठरली. सामनावीराची माळ या वर्ल्ड कपमध्ये सर्वप्रथम पाच विकेट टिपणाऱया मिचेल सॅण्टनरच्या गळय़ात पडली.

न्यूझीलंडकडून मिळालेल्या 323 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नवख्या नेदरलॅण्ड्सचा डाव 46.3 षटकांत 223 धावसंख्येवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून कॉलिन एकरमनने सर्वाधिक 69 धावांची खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. त्यानंतर तेजा निदामनुरू (21), कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (30) व सायब्रॅण्ड एंजलब्रिश्ट (29) हे इतर धावांची विशी ओलांडणारे फलंदाज ठरले. न्यूझीलंडकडून मिचेल सॅण्टनरने 59 धावांत सर्वाधिक 5 विकेटस् टिपल्या. तो या वर्ल्ड कपमध्ये पाच विकेटस् घेणारा पहिला गोलंदाज ठरला. मॅट हेन्रीने 3, तर रचिन रवींद्रने एक गडी बाद केला.

त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 बाद 322 धावसंख्या उभारली. ड्वेन कॉन्वे (32) व विल यंग (70) यांनी 12.1 षटकांत 67 धावांची सलामी दिली. या दोघांनंतर रचिन रवींद्र (51), डॅरिल मिचेल (48) व कर्णधार टॉम लॅथम (53) यांनीही उपयुक्त फलंदाजी केली. शेवटच्या हाणामारीच्या षटकांत मिचेल सॅण्टनरने 17 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 36 धावांची वादळी खेळी करत न्यूझीलंडला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. नेदरलॅण्ड्सकडून आर्यन दत्त, पॉल वॅन मिकरेन व रोलॉफ वॅन डर मर्व्ह यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले. बास डी लीडेने एक फलंदाज बाद केला.