Crime: दिल्लीची महिला, गाझियाबादमध्ये आत्महत्या अन् मुंबईत सापडली जिवंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी नवी दिल्लीत राहणाऱ्या एका श्रीमंत कुटुंबातील विवाहित महिलेने स्वत:च्याच आत्महत्येची कथा रचल्याचे उघड झाले आहे. कोमल तालान असे या महिलेचे नाव आहे. दिल्लीतील या महिलेची कार गाझियाबादमधील हिंडन बॅराजजवळ आढळली होती. या गाडीत एक सुसाईड नोट सापडली होती. यावरून तिने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात होता. परंतु ती मुंबईत जिवंत सापडल्याने आत्महत्येची खोटी कथा समोर आली.

‘नवभारत टाइम्स‘ने दिलेल्या वृत्तानुसार, कोमल शुक्रवार सायंकाळपासून बेपत्ता होती. तिच्या सासरच्यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर शनिवारी सकाळी गाझियाबादमझील हिंडन बॅराज येथील तलावाजवळ कोमलची स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीमध्ये एक सुसाईड नोट पोलिसांना सापडली. पोलिसांनी महिलेने तलावात उडी घेत आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला आणि तीन दिवस पाणबुड्यांनी शोधाशोध केली. परंतु मृतदेहाचा पत्ता लागला नाही.

दरम्यान, कोमलने सुसाईड नोटमध्ये पतीवर त्रास दिल्याचा आरोप लगावला होता. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे शोधाशोध केल्यानंतरही मृतदेह सापडला नाही. मृतदेह न सापडल्याने पोलिसांना वेगळाच संशय आला. अधिक शोध घेतला असा ज्या महिलेने आत्महत्या केली असे समजले जात होती ती मुंबईमध्ये जिवंत सापडली.

कोमलचे वडील अनिल तालान (भाकियूचे राष्ट्रीय सचिव) यांनी सांगितले की, कोमलचे लग्न गेल्या वर्षी जैथाली येथे राहणाऱ्या अभिषेक याच्याशी झाले होते. त्याचे वडील दिल्ली पोलिसात कार्यरत आहेत. लग्नामध्ये एक ऑडी कार, 51 लाख रोख आणि 90 तोळे सोने तिच्या सासरच्यांना दिले होते असे अनिल म्हणाले. यानंतरही तिला हुंड्यासाठी सासरी त्रास दिला जात होता, असेही ते म्हणाले.