
सामना प्रतिनिधी । शिर्डी
कॅनडामध्ये राहत असलेल्या अनिवासी हिंदुस्थानी साईभक्ताच्या मर्सडीज कारमधून चार लाख रुपयांची रोकड, पासपोर्ट, व्हिसा व २० हजार रुपयांचा मोबाईल चोरटय़ांनी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी साईमंदिर गेट क्रमांक पाचसमोर घडली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्ही. कृष्णमूर्ती असे अनिवासी हिंदुस्थानी साईभक्ताचे नाव असून, कारचालक संजय विजय परब (रा. डोंबिवली) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कॅनडातील अनिवासी हिंदुस्थानी व्ही. कृष्णमूर्ती हे त्यांची पत्नी अनुराधा कृष्णमूर्ती आणि काही नातेवाईकांसह रविवारी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. सकाळी ७ वाजता ते साईमंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक ५ मधून दर्शनासाठी गेले होते. यावेळी अनुराधा कृष्णमूर्ती यांनी आपली पर्स आणि मोबाईल गाडीतच ठेवले होते. व्ही. कृष्णमूर्ती, अनुराधा कृष्णमूर्ती व त्यांचे काही नातेवाईक दर्शनासाठी गेल्यानंतर कारचालक संजय परब गाडीतच बसलेले होते. याचवेळी एक अनोळखी माणसाने गाडीजवळ येऊन तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे परब यांना सांगितले. परब गाडीखाली उतरून पैसे बघत असतानाच त्या इसमाने गाडीचा दरवाजा उघडून अनुराधा यांची पर्स व मोबाईल लांबवला. मात्र, परब यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही. कृष्णमूर्ती व त्यांच्या पत्नी अनुराधा दर्शन करून पुन्हा गाडीकडे आल्या तेव्हा त्यांनी पर्स व मोबाईबाबत विचारणा केली. त्यानंतर पर्स आणि मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. पर्समध्ये चार लाख रुपये रोख, पासपोर्ट, व्हीसा आदी कागदपत्रे तसेच २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल असल्याचे अनुराधा यांनी सांगितले. कारचालक संजय परब यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
साईभक्तांची सुरक्षा वाऱ्यावर
शिर्डीत साईभक्तांना लुटण्याच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त मोठा पोलीस फौजफाटा शिर्डीत तैनात करण्यात आला आहे. मात्र, गुन्हेगारी रोखण्यात शिर्डी पोलिसांना पूर्णपणे अपयश आल्याचे दररोज घडणाऱया गुह्यांवरून लक्षात येत आहे. गत पंधरवडय़ात उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधिशांची फसवणूक झाल्याचे उदाहरण ताजे असताना विदेशी साईभक्तांचे पासपोर्ट, व्हीसा, तसेच रोख रक्कम चोरीला गेल्याने साईभक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
























































