
‘‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडे महाराष्ट्राला डिवचणारी वक्तव्ये केल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्यापेक्षा येथे बसून त्यांना तत्काळ त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे होते. पण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना का घाबरतात, हे समजत नाही. किंबहुना गप्प राहण्यासाठी त्यांच्यावर वरून दबाव दिसतोय,’’ अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
जयंत पाटील म्हणाले, ‘‘कर्नाटकची निवडणूक होऊ घातली आहे. तिकडच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राबद्दल हवे तसे बोलणे आणि मराठी माणसांच्या मागे शुक्लकाष्ट लावून देण्याचे प्रकार केंद्र सरकार मूकपणाने पाहत आहे. ‘तेथील निवडणुकीसाठी तुम्हाला काय दंगा करायचा तो करा, आम्ही महाराष्ट्राला गप्प बसवतो’ अशातला हा प्रकार आहे. जसे गुजरातला उद्योग पळविताना ‘तेथे निवडणुका आहेत, गप्प बसा,’ असे वरच्यांनी म्हटल्यावर आदेश पाळणारे हे दोघे आहेत. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलत असूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शांत आहेत.’’
‘‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही आमच्या सरकारचीच जुनी कल्पना आहे. तथापि, ‘जलयुक्त शिवार’चे काम पारदर्शी व्हावे. मागच्या ‘जलयुक्त शिवार’ अंमलबजावणीत अनेक त्रुटी राहिल्या. त्यामुळे कामाच्या बाबतीत आक्षेप झाले. तशी गोष्ट होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. शरद पवार यांना धमकीचा विषय गंभीर आहे. त्यासाठी सरकारने आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. ताबडतोब याची दखल घेऊन, अशी धमकी कोठून आली, याचाही शोध घेतला पाहिजे. आवश्यक सुरक्षितता देण्याची व्यवस्था केली पाहिजे,’’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
पत्रकारावर मर्यादा आणण्याचा प्रकार जनतेला आवडणार नाही
– ‘‘ज्या पत्रकाराने अँगलमध्ये फोटो घेतला, त्याबद्दलही आक्षेप घेण्यात आला आणि त्या पत्रकाराला दिवसभर बसवून ठेवण्यात आले. घटनेचा वृत्तान्त जनतेपर्यंत पोहोचविला, याचा राग मानून एखाद्या पत्रकाराला डांबून ठेवण्याचे काम महाराष्ट्रात आणि देशात आता व्हायला लागले आहे. काय छापावे, काय नाही, काय दाखवावे, काय नाही, या अनुषंगाने चॅनेलवर मर्यादा घातल्या जात असल्याचे आम्ही आजवर ऐकत होता. आता तर पत्रकारांनी फोटो काढले, त्यांनी बातमी दिली, तर त्यावरही मर्यादा आणण्याचे काम सुरू झाले आहे. तुम्ही पाहिजे तसे बोलायचे आणि पत्रकारांवर बंधने आणायची, हे योग्य नाही. पत्रकार शाईचा वापर तुम्ही जे कृत्य करता, त्याचे वर्णन करण्यासाठी करतात. पत्रकारांनी अंगावर शाई फेकल्याचे आपल्याला तरी आठवत नाही,’’ असेही ते म्हणाले.
ऍड. सदावर्ते यांचा बोलविता धनी वेगळा
– ‘उदयनराजेंना अटक करा’, म्हणणाऱया ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. सत्तारूढ पक्षातील लोक त्यांचा वापर करीत आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सत्ताधाऱयांना बोलता येत नाही, ते सदावर्ते यांच्यामार्फत बोलले जात आहे. सदावर्ते बोलतात त्याअर्थी कोणीतरी त्यांना बोलायला सांगितले आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.


























































