राहुल नार्वेकर कुलाब्याचेच, बिनधास्त बांधा झोपडय़ा! ‘मनोरा’च्या भूखंडावर पसरली अफवा, 40 जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुलाबा मतदारसंघाचे आपले आमदार राहुल नार्वेकर आता विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी मनोरा आमदार निवासाचा भूखंड गरीबांना झोपडय़ा बांधण्यासाठी दिल्याची अफवा आज पसरली. ही अफवा पसरताच कफ परेड परिसरात शेकडो नागरिकांनी बांबू, काठय़ा, ताडपत्री घेऊन मनोराच्या भूखंडावर धाव घेतल्याने एकच गोंधळ उडाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सरकारी जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून 40 जणांना अटक केली आहे.

मनोरा आमदार निवासस्थान पाडण्यात आलं असून त्याजागी नवं टोलेजंग आमदार निवास बांधलं जाणार आहे. सध्या हा भूखंड मोकळा असल्यानं झोपडपट्टीदादांचा त्यावर डोळा आहे. या भूखंडावर झोपडय़ा बांधण्याबाबत कफ परेडच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना माहिती मिळताच त्यांनीदेखील मनोरा आमदार निवासाच्या मोकळ्या भूखंडावर गर्दी केली. एवढा जमाव अचानक तेथे आल्याने तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना आपल्या नावाचा वापर करून लोक भूखंडावर अतिक्रमण करत असल्याचं समजताच त्यांनीही पोलिसांना याची माहिती देत संबंधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

मनोरा आमदार निवास्थानाचा भूखंड कुलाबा मतदार संघाचे आमदार व विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी झोपडय़ा बांधण्यासासाठी दिल्याची अफवा कुणीतरी पसरवली. शेकडो नागरिक झोपडी बांधण्यासाठी बांबू, काठय़ा, ताडपत्री, पत्रे असे हाताला मिळेल ते साहित्य घेऊन भूखंडावर पोहचले. प्रत्येक जण मिळेल ती जागा निवडून, जमिनीची आखणी करून झोपडीसाठी आणलेले साहित्य टाकून जागेवर कब्जा करू लागला.