जागरूक ग्राहकांनी शिकवला गॅस एजन्सीला धडा, एका सिलिंडरमागे घ्यायचे 31 रुपये अतिरिक्त शुल्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सटाणा

गॅस सिलिंडर वाहतुकीच्या नावाखाली ग्राहकांकडून अतिरिक्त पैशांची वसुली करणाऱ्या सटाणा येथील गॅस एजन्सी चालकांना विरगाव येथील गॅस ग्राहकांनी शनिवारी धारेवर धरले. शहरापासून 15 किलोमीटरच्या परिघात कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता सिलिंडर वितरित करण्याबाबत कंपनीचे निर्देश आहेत. मात्र विरगाव येथील गॅस ग्राहकांकडून चक्क 31 रुपये अतिरिक्त स्वीकारले जात होते. गॅस एजन्सी चालक व कर्मचारीवर्गाच्या या उद्दामपणाला ग्राहकांनी जशास तसे उत्तर दिल्यानंतर अखेर गॅस एजन्सी चालकाने नमते घेत 31 रुपये कमी स्वीकारत गॅस वाटप केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.

सटाणा शहरात सद्यस्थितीत एच पी कंपनीअंतर्गत गॅस वितरण करणाऱया तीन गॅस एजन्सी आहेत. दर शनिवारी यातील दोन सुपरिचित गॅस एजन्सीचे वाहन गॅस वितरित करण्यासाठी विरगाव परिसरात येत असते. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सटाणा येथील एका एजन्सीची गाडी गॅस वितरित करण्यासाठी आली असता गाडीवरील कर्मचाऱयांनी एका सिलिंडरसाठी 704 रुपयांची अधिकृत पावती देत ग्राहकांकडून 735 रुपयांची मागणी केली. मात्र यावेळी गॅस ग्राहकांनी या लुटीला विरोध केल्याने कर्मचाऱयांनी गॅस वितरण बंद करून गॅस ग्राहकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी येथील जागरूक ग्राहक कमलाकर शेवाळे यांनी संबंधित कंपनीच्या कस्टमर केयरशी संपर्क साधीत गॅस वितरणाशी निगडित माहिती जाणून घेतली. यावेळी शहरापासून 15 किमीच्या आत वाहतुकीच्या नावाखाली गॅस एजन्सीधारक अतिरिक्त शुल्क आकारू शकत नाही. तसेच या आशयाच्या सूचना जिह्याभरातील गॅस एजन्सी धारकांना देण्यात आल्या असल्याचा निर्वाळा संबंधित कंपनीकडून देण्यात आल्याने अखेर गॅस ग्राहकांपुढे एजन्सी चालकाला नमते घ्यावे लागले.