चक्रीवादळ ‘अर्णव’चा आंध्र प्रदेशला धोका, 2 दिवस शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णव’’ चक्रीवादळ अधिक तीव्र होत असून, 28 ऑक्टोबरला ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील भागांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 125 किलोमीटरपर्यंत, तर वाऱ्याचे जोरदार झोत ताशी 140 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांवर भर दिला आहे. ओडिशा सरकारने मंगळवार आणि बुधवार रोजी पाच जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवून चक्रीवादळ मदत केंद्रांमध्ये त्यांची सोय करण्याची तयारी सुरू आहे. या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशच्या उत्तर आणि मध्य किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ‘अर्णव’ चक्रीवादळ 28 ऑक्टोबरच्या सकाळी आंध्र प्रदेशातील बापटला आणि विशाखापट्टणमदरम्यानच्या किनारपट्टीवर वादळ धडकू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

वादळाचा संभाव्य मार्ग लक्षात घेऊन आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवरील भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाकडून बचावकार्य आणि आपत्कालीन व्यवस्थेची तयारी केली जात आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, किनारपट्टीच्या धोकादायक भागात जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.