
सामना ऑनलाईन । लखनौ
अलिगढ इथल्या अडीच वर्षांच्या चिमुरडीच्या हत्येनंतर उसळलेल्या संतापात आता अजून भर पडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका 12 वर्षांच्या दलित मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे घडली. शुक्रवारी या आरोपींचं आणि पीडितेच्या कुटुंबीयांचं ड्रेनेजच्या बांधकामावरून भांडण झालं होतं. शुक्रवारी संध्याकाळी तिच्या घरातूनच या सहा आरोपींनी तिला उचलून नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी घरच्यांनी विरोधही केला. मात्र, आरोपींनी त्यांना मारहाण केली.
पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसंच, या प्रकरणी सहा जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींपैकी 4 जणांना अटक झाली असून अद्याप दोन आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
























































