समुद्रात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे किनाऱ्यासह जैवविविधतेचे नुकसान! स्यू मोटो याचिकेवर उद्या सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तौक्ते वादळात समुद्रातील कचरा किनाऱ्यावर आला असून मुंबईसह राज्यातील इतर किनारपट्टीची नासधूस झाली आहे. एवढेच काय, तर या कचऱ्यामुळे समुद्रातील जैवविविधतेचेही नुकसान झाले आहे. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी याप्रकरणी स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली असून यावर शुक्रवारी 2 जुलै रोजी सुनावणी ठेवली आहे तसेच सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्रातील कचरा मरीन ड्राईव्हसह इतर किनारपट्टीवर पसरली असून याप्रकरणी वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. याची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने बुधवारी स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली. आम्हाला माहीत आहे की, कोविडमुळे राज्य सरकारवर कामाचा बराच दबाव आहे, पण या समस्येकडेदेखील दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यातच मान्सून सुरू झाला असून हा विषय लांबणीवर टाकूनही चालणार नाही असे न्यायमूर्ती म्हणाले. त्यानंतर खंडपीठाने सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत सुनावणी तहकूब केली.