धक्कादायक! ‘दंगल’फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचा 19 व्या वर्षी मृत्यू

बॉक्स ऑफिसवर कमाईचे सारे रेकॉर्ड मोडणाऱया ‘दंगल’ या चित्रपटातील बालकलाकार सुहानी भटनागर हिचे शनिवारी निधन झाले. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, फरीदाबाद सेक्टर-15 येथील अजरौंडा स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘दंगल’ चित्रपटात सुहानी हिने आमीर खानच्या लहान मुलीची म्हणजेच बबीता फोगटच्या बालपणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या चित्रपटाशिवाय ती काही टीव्ही जाहिरातींमध्येही दिसली, मात्र नंतर तिने कामातून ब्रेक घेऊन अभ्यास पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण करून आपण चित्रपटांमध्ये परतणार असल्याचे तिने अनेकदा मुलाखतींमधून सांगितले होते. ‘सुहानी अतिशय हुशार, नेहमी टीम प्लेअर बनून काम करणारी मुलगी होती. तुझ्याशिवाय ‘दंगल’ चित्रपट अपूर्ण राहिला असता. सुहानी, तू कायम आमच्या हृदयात एक स्टार म्हणून राहशील,’ अशा शब्दांत आमीर खान प्रॉडक्शनकडून सुहानीच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला.

औषधांच्या रिऍक्शनमुळे शरीरात पाणी

काही दिवसांपूर्वी सुहानीचा अपघात झाला होता. या अपघातात तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. उपचारासाठी ती घेत असलेल्या औषधांच्या रिऍक्शनमुळे तिच्या शरीरात पाणी झाले. तिला फरिदाबादमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.