पावसाळा सुरू होऊनही धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष, नगर मनपाच्या नोटिशीनंतरही इमारतींचा सर्रास वापर सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू होऊनही शहरातील धोकादायक इमारतींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. धोकादायक घोषित केलेल्या इमारतींवरही कारवाई झालेली नाही. मनपाच्या नोटिशीनंतरही काही धोकादायक इमारतींचा सर्रास वापर सुरू असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून 120 इमारत मालकांना नोटिसा बजावलेल्या आहेत. संबंधितांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून ते महापालिकेत सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, काही अपवाद वगळता अनेकांकडून स्ट्रक्चरल ऑडिट सादर झालेले नाही. तसेच, महापालिकेने यापूर्वी 12 इमारती धोकादायक असून, त्या तत्काळ उतरविण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापि सात इमारतींवर कारवाई झालेली नाही.

अनेक मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये भाडेकरूंचे वास्तव्य आहे. तेथील वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने कारवाई होत नाही. अशा इमारती पडून तेथील व्यक्तींचा जीव गेल्याच्या घटना नगरमध्ये यापूर्वी घडलेली आहे. त्यामुळे अशा इमारतींबाबत मनपानेही न्यायालयात वस्तुस्थिती मांडून इमारत पाडण्याबाबत परवानगी मिळवणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत नगर शहरात पडणाऱया पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. कमी कालावधीत अधिक पाऊस पडत असल्याने त्याचा सर्वांत मोठा धोका इमारतींना आहे. आधीच पावसाळ्यात नगर शहरातील अनेक सखल भागात पाणी साठताना दिसत आहे. मागील वर्षी सीना नदी काठ, नालेगाव, कल्याण रोडवरील अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष होत असल्याने मनपा स्वतःहून आपत्तीला निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे.