साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना जामीन मंजूर, दापोली दिवाणी न्यायालयाचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्र किाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी माजी पालकमंत्री अनिल परब आणि सदानंद कदम आज दापोली कोर्टात प्रत्यक्ष हजर झाले होते. याप्रकरणी दापोली न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 15 हजारांचा जामीन मंजूर केला आहे.

समुद्र किनाऱ्यावर CRZ, ना – विकास क्षेत्र (NDZ) परिसरात साई रिसॉर्ट बांधल्याच्या संबंधात सरकारने दापोली न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर हा जामीन मंजूर करण्यात आला. आता पुढील तारीख 23 फेब्रुवारी 2023 रोजी देण्यात आली आहे. पुढील तारीख दोषारोप पूर्व सुनावणीसाठी नेमण्यात आली आहे.

माजी पालकमंत्री अनिल परब यांनी आज पहिल्यांदाच दापोली दिवाणी न्यायालयात हजेरी लावत जामीन मंजूर करून घेतला तसेच दापोली पोलीस स्थानकात जाऊन त्यांनी काही महत्त्वाचा जबाबही नोंदवला आहे. अनिल परब यांना दिवाणी न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाचे पालन करत आज ते प्रत्यक्ष हजर राहिले व जामीन मिळाला.

आपली पुढील न्यायालयीन लढाई सुरूच राहील अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली. आपल्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस स्थानकात वेगवेगळ्या प्रकारच्या सहा केसेस दाखल आहेत. तसेच वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी आपला यापूर्वी तपासही केला आहे परंतु आपला पूर्णपणे न्यायदेवतेवर विश्वास आहे त्यामुळे आपण या सर्व प्रकरणातून निर्दोष सुटू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.