
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सारगाव येथे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना संबोधित केले. भाषणादरम्यान माईकमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यावेळी मुख्य डायस सोडून त्यांनी माईक हातात घेऊन भाषण सुरू केले. माझ्या मेळाव्यात कुणीतरी घुसला, माईकची वायर कापली, परंतु माझा आवाज कुणीच दाबू शकणार नाही, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱयांना ठणकावले.
मेळाव्यात बोलताना त्यांनी परळीतील पराभव आणि त्यांना पक्षाकडूनच कशा प्रकारे अनेकदा डावलले गेले त्याला सडेतोड उत्तरे दिली. तसेच तुम्हाला न्याय देण्यासाठी मैदानात उतरणार, आता पाडण्यासाठी लढणार. मी मनाने कधीच खचले नाही, तुमची सेवा करण्यात खंड पडला इतकेच. त्याबद्दल मी तुमची माफी मागते, असे सांगतानाच पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेतही त्यांनी दिले.
कुणी म्हणते, पंकजाताई या पक्षात चालल्या, कुणी म्हणते, ताई त्या पक्षात चालल्या, पण पंकजा मुंडे यांची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. अनेक पदे देऊनसुद्धा तुम्हाला ती मिळवता आली नाही, पद न देताही निष्ठा काय असते ते या लोकांना विचारा, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला. तसेच पक्षांतराबाबत उडणाऱया वावडय़ांना उत्तरे दिली. नीतिमत्ता बाजूला ठेवून राजकारण करणे हे देशाच्या हिताचे नाही, असे विधान मोहन भागवत यांनी केले आहे, पण वाघ आणि बकरीचा बगळा करता येणार नाही. जिंकण्यासाठी तुम्ही नीतिमत्ता आणि निष्ठा गहाण ठेवू शकत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. शिवशक्ती परिक्रमा करण्यापूर्वी मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती आहे असे मला वाटत होते, पण शिवपरिक्रमेनंतर मला लोकभावनांचा साक्षात्कार झाला, असेही त्या म्हणाल्या.
दोन दिवसांत 11 कोटी बँकेत
माझ्या कारखान्यावर छापे टाकले तेव्हा तुम्ही दोन दिवसांत 11 कोटी जमा केले. मी हरले तरी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही. तुमचे उपकार फेडणे अशक्य आहे. तुम्ही उन्हात आहात, तर मीही उन्हात आहे. येत्या काळात मला सत्तेपासून दूर ठेवा, पण माझ्या कार्यकर्त्यांना दूर ठेवू नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी स्वपक्षाला केले. येत्या काळात शेतकरी, शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
























































