परीक्षण : मावळती संस्कृती आणि हृद्य आठवणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> श्रीकांत आंब्रे

डॉ. सुधीर रसाळ हे मराठवाडय़ाच्या साहित्य जगतातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, उत्तम समीक्षक, लोकप्रिय प्राध्यापक, वाङ्मयीन, सांस्कृतिक, सामाजिक चळवळीचे साक्षीदार आणि निजामी राजवटीच्या मध्ययुगीन वातावरणाच्या झळा सोसूनही मराठवाडय़ातील सांस्कृतिक आणि वाङ्मयीन परंपरांचा मराठी वारसा जपणारे एक चिकित्सक आणि संवेदनशील वाङ्मयीन अभ्यासक. मराठवाडय़ात जन्मलेले आणि वाढलेले डॉ. सुधीर रसाळ प्रामुख्याने व्यासंगी समीक्षक आणि मराठवाडय़ातील साहित्यिक चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात असले तरी त्यांच्या प्रतिभेचे, संवेदनशील मनाचे, आजूबाजूचे जीवन आणि व्यक्तिचित्रे अचूक टिपण्याचे सामर्थ्य त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनातून पाहायला मिळते.

ज्या मराठवाडय़ातील गावात त्यांचे आयुष्य गेले तिथले अनुभव, ज्या रसरशीतपणे त्यांनी आपल्या ‘लोभस’ या त्यांच्या स्वतःच्या आणि सभोवतालच्या जगाविषयी मांडले आहेत तसेच आता ‘माणसं जिव्हाळ्याची’ या त्यांच्या नव्या लेख संग्रहात साकारले आहेत. त्यात ते स्वतःविषयी, घरातल्या वेगवेगळे स्वभाव विशेष असलेल्या माणसांविषयी लिहितात तसेच आजूबाजूच्या सहवासात आलेल्या व्यक्तींविषयी, निजामी राजवटीत स्वतःच्या आणि एकूणच मराठवाडय़ाच्या झालेल्या परवडीविषयी लिहितात. प्रामुख्याने व्यक्तिचित्रणात्मक लेखनावर त्यांचा भर आहे आणि ही व्यक्तिचित्रे ते अगदी सहज आणि सराइतपणे रंगवतात. त्या त्या व्यक्तिरेखेचे नेमके स्वभावविशेष त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. मग स्वतःच्या घरातील वडील माणसे असोत की गंगाधर गाडगीळ किंवा बा. भ. बोरकर यांच्यासारखी मोठी साहित्यिक व्यक्तिमत्त्वे असोत. कारण आजूबाजूला जे पाहिले, जे भोगले, अनुभवले त्याचे पडसाद त्यांच्या संवेदनशील मनात लहानपणापासून उमटत गेले आणि त्यातून तयार झालेल्या जीवनदृष्टीतून आजूबाजूच्या सर्व जगाकडे पाहण्याची एक प्रगल्भ जाणीव त्यांना लाभली हे त्यांच्या सर्व लेखनातून जाणवते.

बालपणापासून वयाच्या 14 व्या वर्षापर्यंतच्या निजामी सत्तेत आधुनिकतेचा वासही लागणार नाही अशा तऱ्हेने जाणीवपूर्वक मध्ययुगीन संस्कृतीत डांबून ठेवण्याचा काळ त्यांनी अनुभवला. पश्चिम महाराष्ट्र जेव्हा विसाव्या शतकात होता तेव्हा आमचं जीवन एकोणीसाव्या शतकातले होते ते लिहितात. या संग्रहात गावाच्या आणि काही व्यक्तींच्या चित्रणातून तेथील मध्ययुगीन संस्कृतीचे चित्र अगदी स्पष्टपणे प्रत्ययास येते. संग्रहात काही मान्यवर साहित्यिकांची व्यक्तिचित्रेही डॉ. रसाळ यांनी रेखटली आहेत. या व्यक्तिचित्रांतून त्या व्यक्तींबरोबरच महाराष्ट्राच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक वातावरणाचेही एक दर्शन घडते.

संग्रहात माझं गाव गांधेली, माझं आजोळ, हैदराबादेतले दिवस, बाई, आम्ही सारे मित्र, ज्येष्ठ स्नेही गंगाधर गाडगीळ, बा. भ. बोरकरांच्या निमित्ताने, ग्रीक परंपरेतला विद्वान ः नरहर कुरुंदकर, कांत ः एक अंतर्बाह्य कवी, तर्कवादी प्रा. भालचंद्र महाराज कहाळेकर, कोशकर्ते स. मा. गर्गे असे बारा लेख आहेत. स्वतःच्या गावापासून सुरू झालेला हा जीवन प्रवास एखाद्या रसरशीत कादंबरीसारखा घरातल्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा, कथेत घडणाऱ्या प्रसंगासारखे नाटय़मय प्रसंग, सभोवतालची निसर्गाची पार्श्वभूमी, कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक संस्कृतीसह मोठमोठय़ा साहित्यिक, समीक्षक विद्वानांच्या प्रांगणात कधी येऊन पोहोचतो हे कळतही नाही. आपल्या गांधेली गावाचे, तेथील रीतीभातींचे, निसर्गाचे, कुटुंबाचे, घरातील माणसांचे, व्यवहाराचे त्यांनी जिव्हाळ्याने केलेले वर्णन डोळ्यांसमोर ते गाव आणि घर उभे करते. आज गावाच्या आधुनिक रूपाची वर्णने ऐकून पूर्वीचे ते गाव त्यांना हरवल्यासारखे वाटते. म्हणून पन्नास वर्षांत तिथे फिरकावे असेही त्यांना वाटत नाही यातच सारे आले. बोधेगाव या आजोळाच्या आठवणीने ते हरखून जातात. तिथली माणसे, लग्नसमारंभ, त्यातील रीतीभाती यांची वर्णने करताना किती लिहू आणि किती नको असे त्यांना होऊन जाते. चतुर्थीसारखे आजोळातील सण, खाष्ट आजोबा, प्रेमळ मामा-मामी ही कौटुंबिक नातीही मग रसरसून बहरतात. लेखकाचे हैदराबादेतील महाविद्यालयीन जीवन, तिथे एम.ए.ला प्रा. भगवंत देशमुख यांचे लाभलेले मार्गदर्शन, मराठवाडा साहित्य परिषदेशी आलेला संबंध, अनंत भालेराव या थोर पत्रकार व्यक्तिमत्त्वाशी झालेला परिचय डॉ. ना. गो. नांदापूरकर, वा. ल. कुलकर्णी यांच्या शैक्षणिक व्याख्यानांचा झालेला लाभ आणि त्यानंतर मराठी साहित्यात केलेली लिखाणाची मुशाफिरी, सरकारी कॉलेजात मराठी प्राध्यापकाची मिळालेली नोकरी हे सारे अनुभव त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाला कसे पोषक ठरले ते अनुभवण्यासारखे आहे.

‘बाई’ या लेखात स्वतःच्या आईचे त्यांनी रंगवलेले व्यक्तिचित्र विलोभनीय आहे. आईला त्यांच्या घरातील सारे ‘बाई’ म्हणत. बाईच्या एकूण आयुष्याचे सिंहावलोकन करताना मराठवाडय़ात रेंगाळत राहिलेल्या मध्ययुगातून आधुनिक युगात होणाऱ्या संक्रमण काळाचा अनुभव मी तिच्या आयुष्याद्वारे घेतो, असे ते सांगतात. त्यांच्या मित्रमंडळीतील चंद्रकांत भालेराव, नरेंद्र चपळगावकर, प्रा. अरुण चव्हाण, प्रा. तु. शं. कुलकर्णी, प्रा. म. द. पाध्ये तसेच ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव यांच्यासारखी अनेक नामवंत मंडळी होती तसेच जिवाला जीव देणारा सर्व स्तरातील मित्रपरिवार होता. लेखनातून भेटलेले आणि प्रत्यक्षात भेटून मित्र झालेले प्रा. गंगाधर गाडगीळ आणि कविवर्य बा. भ. बोरकर यांची व्यक्तिचित्रेही सुरेख उतरली आहेत. ती प्रत्यक्षात वाचण्यासारखी आहेत. अंतर्बाह्य कवी असलेले नांदेडचे वा. रा. कांत यांच्यावरील डॉ. रसाळ यांचा लेखही असाच. नेमक्या शब्दांत त्यांचं व्यक्तिमत्त्व रेखाटणारा. प्रा. भालचंद्र कहाळेकर, ग्रीक परंपरेतला विद्वान नरहर कुरुंदकर, कोशकर्ते स. मा. गर्गे यांच्यावरील लेख तसेच स्वतःवरील ‘मी’ या लेखात त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचे त्यांनी स्वतः केलेले निखळ आत्मपरीक्षण त्यांच्या एकंदर जगण्याचा अर्क आहे. ही व्यक्तिचित्रे जशी काही गावांची आणि सान्निध्यात आलेल्या काही व्यक्तींची आहेत तशीच ती एका मावळलेल्या संस्कृतीची आहेत, हे अगदी खरे आहे.

माणसं जिव्हाळ्याची

लेखक ः सुधीर रसाळ

प्रकाशक ः राजहंस प्रकाशन

पृष्ठs ः 174, मूल्य ः रुपये 250/-