
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी ही माहिती देण्यात आली आहे. राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली असली तरी सध्या सौम्य लक्षणे आहेत. असे असले तरी ते सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या पथकाने तपासणी केल्यानंतर संरक्षणमंत्र्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
ते आज दिल्लीतील हिंदुस्थानी वायुसेनेच्या कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते पण त्यांना ते टाळावे लागले. अधिकृत माहिती अशी की, ‘ते गुरुवारी नवी दिल्ली येथे हिंदुस्थानच्या वायुसेनेच्या कमांडर्सच्या परिषदेत सहभागी होणार होते, परंतु कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते त्यांना कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही’.
‘संरक्षण मंत्री बुधवारी आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते जेथे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि इतर वरिष्ठ लष्कर अधिकारीही उपस्थित होते. सिंह यांनी लहान शस्त्रांच्या गोळीबाराच्या सिम्युलेटरवर गोळीबार करण्याचा सराव केला’, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली.
दरम्यान, हिंदुस्थानात आज 12,591 नवीन कोविड-19 संसर्गाची नोंद झाली आहे, जी बुधवारच्या तुलनेत जवळपास 20 टक्क्यांनी वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या 65,286 इतकी आहे आणि मृतांची संख्या 5,31,230 वर गेली आहे.


























































