ज्येष्ठ नागरिकाला ‘हनी ट्रॅप’मध्ये फसवणाऱ्या महिलेला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम येथील हरसरू गावात राहणाऱ्या महिलेने एका 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. नंतर त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे.

एप्रिल महिन्यात या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याची ओळख एका महिलेबरोबर झाली होती. त्याची अनेक ठिकाणी ओळख असल्याने महिलेने तिच्या मुलांना नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्याच्याकडून मदत मागितली. त्यानंतर दोघे वरचेवर भेटू लागले. बघता बघता त्यांच्यात मैत्री झाली. दोघेजण एकमेकांच्या घराबद्दल मुलांबद्दल गप्पा मारत. महिलेने गोड बोलून त्याच्याकडून आवश्यक खासगी माहिती मिळवली.

त्यानंतर तिने एक दिवस तिने त्याला आपल्या फ्लॅटवर बोलावले. गुंगीचे औषध टाकलेले कोल्ड ड्रिंक त्याला पिण्यास दिले. तो अर्धवट बेशुद्धावस्थेत असताना तिने त्याच्याबरोबर अश्लिल फोटो काढले. वृद्धाला शुद्ध आल्यावर तो घरी आला. त्यानंतर महिलेने त्याला फोन केला व त्याने अर्धवट बेशुद्धावस्थेत तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप केला. तसेच त्याचा व्हिडीओही आपल्याकडे असल्याचा दावा करत तिने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. घरातल्यांना याबद्दल कळाले तर आपली बदनामी होईल अशी भीती वाटत असल्याने वृद्ध तिला पैसे देत होता. पण नंतर तिच्या मागण्या वाढू लागल्या.
तिने त्याचा प्लॉट स्वतःच्या नावावर करून घेतला. नंतर तिच्या पैशांच्या मागण्या वाढू लागल्या. काही दिवसांपूर्वी तिने एका मित्राच्या मदतीने पुन्हा वृद्धास धमकावले आणि गुरुग्राम येथील सेक्टर 92 मधील त्याचा फ्लॅटही तिच्या नावावर करण्यास सांगितले.

यामुळे वृद्धाला धक्का बसला. पण अखेर हिंमत करत त्याने पोलीस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.