दिल्ली हायकोर्टाने यूट्यूबला झापले; आराध्या बच्चनवरील फेक न्यूज हटवण्याचे दिले निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
remove-fake-news-aaradhya-bachchan

बॉलिवूडचे शेहनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हिने फेक न्यूज संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी यूट्यूबला अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन यांच्याबद्दलची कोणतीही खोटी बातमी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले. भविष्यात अशा फेक न्यूज शेअर करू नयेत असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या 11 वर्षांच्या मुलीने बुधवारी यूट्यूब टॅब्लॉइडच्या विरोधात तिच्या तब्येतीबद्दल ‘फेक न्यूज’ दिल्याबद्दल उच्च न्यायालयात धाव घेतली. आपल्या विषयी फेक व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या यूट्युब चॅनलविरोधात कारवाई करण्याची मागणी आराध्याने केली आहे. गुरुवारी तिच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली.

उच्च न्यायालयाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर ताशेरे ओढले आणि अशी दिशाभूल करणारा मजकूर पोस्ट केला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी कोणतीही धोरणे नाहीत का, अशी विचारणा केली. दिल्ली हायकोर्टाने यूट्यूबला सांगितले की यूझर्सना एक प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे आणि तेथे जे काही शेअर केले जात आहे त्यासाठी ते जबाबदार नाही, असं म्हणणे पुरेसे नाही.

न्यायालयाने गुगल आणि यूट्यूब प्लॅटफॉर्मला बोलावले ज्यांना याचिकेत पक्षकार करण्यात आले होते आणि त्यांनी आयटी नियमांमधील दुरुस्तीनुसार त्यांचे धोरण बदलले आहे का अशी विचारणा केली. यूट्यूब व्हिडीओवर आक्षेप घेत न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक मुलाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि अशा फेक न्यूज थांबवणे ही यूट्यूबची जबाबदारी आहे.

बिग बींची नात आणि ऐश्वर्या-अभिषेक यांची मुलगी म्हणून आराध्या तिच्या जन्मापासूनच प्रसिद्धीच्या झोतात आहे. तिच्या आयुष्यावर आणि प्रकृतीवर भाष्य करणारा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी प्रसारित झाला होता. तो ऐश्वर्या आणि अभिषेक यांना अजिबात आवडला नव्हता. त्याविरोधात त्या दोघांनीही कारवाईसाठी पुढील पावलं उचलली होती. त्यानंतर आता आराध्यानेही दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली.