बॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्राला सहा महिन्याची शिक्षा

101

सामना ऑनलाईन। मुंबई

चेक बाऊन्सप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री कोयना मित्रा हिला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच तक्रारदार महिेलेला कोयनाने व्याजासह 4.64 लाख रुपये द्यावे असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

हे प्रकरण 2013 मधले असून कोयनाने पूनम सेठी या महिलेकडून 22 लाख रुपये उधार घेतले होते. पण ते परत करताना तिने रोख रक्कम न देता तीन लाख रुपयांचा चेक दिला. पण तो बाऊन्स झाल्याने पूनम यांनी कोयना विरोधात न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, कोयनाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून कोणाला उधार पैसे देण्याइतकी पूनम आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच तिने आपले चेक चोरल्याचा आरोपही कोयनाने केला. मात्र पूनमने चेक चोरल्याचे ती सिद्ध करू शकली नाही. तसेच ते सिद्ध करू न शकण्याचे कुठलेच स्पष्टीकरण तिने न्यायालयाला दिले नाही. यामुळे उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर न्यायालायने कोयनाला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

यावर आपल्याला फसवण्यासाठीच पूनम हे उद्योग करत असल्याचे कोयनाने सांगितले असून न्यायालयाच्या निर्णयाला आवाहन देणार असल्याचे तिने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या