दिल्लीतील उच्चभ्रू भागात तरुणीची हत्या, कॉलेजबाहेर रॉडने वार करत ठार मारले

24 तासांत दोन हत्या झाल्याने दिल्ली हादरली आहे. दिल्लीतील उच्चभ्रू भाग असलेल्या मालवीय नगर भागात शुक्रवारी दिवसाढळ्या एका तरुणीला ठार मारण्यात आलं. ही तरूणी मालवीय नगर भागातील कमला नेहरू कॉलेजमध्ये शिकायला होती. कॉलेजच्या बाहेरच तिच्यावर रॉडने वार करत ठार मारण्यात आलं. आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हल्ला करण्यात आल्यानंतर ही तरुणी गंभीररित्या जखमी झाली होती. तिने तिथेच आपले प्राण सोडल्याचं पोलिसांनी सांगितलं. तरुणीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून पोलीस कॉलेज आणि आसपासच्या परिसरातून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही हत्या होण्यापूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीची तिच्या मित्राने गोळ्या घालून हत्या केली होती. या दोन घटनांनी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका महिलेला तिच्या घराच्या बाहेरच गोळ्या घालून ठार मारलं जातं. दुसऱ्या घटनेत तरुणीला कॉलेज बाहेर दिवसा ढवळ्या ठार मारलं जातं. विशेष बाब म्हणजे हा भाग उच्चभ्रू भाग मानला जातो. दिल्ली महिलांसाठी असुरक्षित आहे हे दाखवण्यासाठी या घटना पुरेशा असल्याचं मालीवाल यांनी म्हटलं आहे. दिल्लीतील परिस्थितीशी कोणालाच देणंघेणं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.