ओसामा बिन लादेनचा मुलगा ‘हमजा’ ठार?

53

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन ठार झाल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने केला आहे. हमजा याला ओसामाचा उत्तराधिकारी म्हणून पाहिले जायचे. ओसामा याच्या मृत्यूचा बदला घेणार अशी धमकी हमजा याने अमेरिकेला दिली होती. तेव्हापासून अमेरिका त्याच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होती. दरम्यान, अमेरिकेच्या प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले असले तरी सरकारकडून त्याला दुजोरा देण्यात आलेला नाही असे सांगण्यात आले आहे.

यामुळे हमजाच्या मृत्यूमागे अमेरिकेचा हात आहे किंवा नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच त्याचा मृत्यू कसा झाला याबद्दलही नेमकी माहिती अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही. पण अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र हमजाचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या सैन्याने ओसामाचा खात्मा केल्यानंतर 2015 साली हमजा याने वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अमेरिकेवर हल्ला करणाऱ अशी धमकी दिली होती. त्यानंतर अमेरिकेने हमजाला जिवंत वा मृत पकडून देणाऱ्याला 10 लाख डॉलरचे (जवळजवळ 7 कोटी रुपये) बक्षिस जाहीर केले होते. 2 मे 2011 रोजी पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे अमेरिकेच्या सील कमांडोजनी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. त्यानंतर हमजा आई व ओसामाच्या तीन पत्नींपैकी एक असलेल्या खैरिया सबार सोबत अबोटाबाद येथेच राहत होता.

अलकायदाचा प्रमुख अल जवाहिरी याने 2015 मध्ये हमजाला जगासमोर आणले होते. त्यावेळी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी हमजाने अमेरिकेला दिली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. 2017 साली अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने हमजाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. त्यानंतर अमेरिकेने हमजावर 10 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले. पण त्यानंतर हमजाने कुठलीही घोषणा सार्वजनिकपणे केली नाही.

अमेरिकेनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा (UNSC) परिषदेनेही मार्च 2019 मध्ये हमजाच्या अटकेसाठी इंटरपोल नोटीस जारी केली. त्याच्या परदेश यात्रेवर बंदी घालण्यात आली. त्याची सर्वसंपत्तीही जप्त करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या