
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करणाऱया ‘आर्टिकल 15’ या सिनेमाविरोधात ब्राह्मण समाज संघटनेने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ‘आर्टिकल 15’ च्या निर्माता, कलाकारांना दिलासा मिळाला आहे. ‘आर्टिकल 15’ सिनेमा अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत असून यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते असे म्हणत ब्राह्मण समाज संघटनेने याचिका दाखल केली होती.
या सिनेमाचे प्रदर्शन थांबवावं अशी मागणीही या संघटनेने केली होती. मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल 15’ सिनेमामध्ये अभिनेता आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे. सोबतच ईशा तलकार, मनोज पाहवा, सयानी गुप्ता, मोहंमद झीशान अयूब, कुमुद मिश्रा आणि नासर यांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे. सिनेमाचे लेखन अनुभव सिन्हा आणि गौरव सोलंकी यांनी केले आहे. हा चित्रपट 28 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. ‘आर्टिकल 15’ ची गोष्ट अशाच उत्तर प्रदेशातल्या एका गावातली आहे. राज्यघटनेतील कलम 15 जातीपातीविरहीत जीवनाचा मंत्र देते, पण आज आपल्याला त्याचा विसर पडला आहे. आज ग्लोबलायझेशनच्या दुनियेतही अनेक छोटय़ा गावांतही जातीपातीचं राजकारण खेळले जाते. दलितांना हीन वागणूक मिळते.



























































