
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली/ श्रीनगर
संभाव्य दहशतवादी हल्ल्यांचे कारण देऊन केंद्र सरकारने शुक्रवारी अमरनाथ यात्रा स्थगित केली आणि यात्रेकरू व कश्मीरातील पर्यटकांना लवकरात लवकर कश्मीरातून निघून जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर दोन दिवसांत कश्मीर खोऱयात प्रचंड तणावाचे वातावरण तर आहेच, पण राजकीय वातावरणही तापले आहे. तशात गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यात रविवारी कश्मीरातील सुरक्षेविषयी चर्चा झाली आणि पाठोपाठ मोदी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक सोमवारी होणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कश्मीरातील टेन्शन तर वाढले आहेच, पण अवघ्या देशाचे लक्ष आता सोमवारकडे लागले आहे.
अमरनाथ यात्रा मार्गावर शुक्रवारी पाकिस्तानने पेरलेला भूसुरुंग आणि एक अमेरिकन स्नायपर रायफल सापडल्यानंतर केंद्र सरकारच्या आदेशानुसार कश्मीरमधील राज्यपाल प्रशासनाने अमरनाथ यात्रा थांबवण्याचा फतवा काढला. अमरनाथ यात्राकाळात पुलवामासारखा मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे सांगत यात्रेकरू आणि कश्मीरातील इतर पर्यटकांना तातडीने घरी पोहचा, अशा सूचना दिल्या गेल्या. त्यामुळे श्रीनगरसह इतर भागात प्रचंड गोंधळाचे वातावरण तयार झाले. पर्यटक व यात्रेकरूंना घरवापसीसाठी सोमवारपर्यंतची डेडलाइन दिल्याने रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर एकच गर्दी उसळली. विमान कंपन्यांनी संधी साधत प्रवास भाडय़ात तब्बल पाचपट वाढ केली. एकीकडे पर्यटकांची अशी धावपळ सुरू असताना नागरिकांनीही रांगा लावून जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. एकूणच खोऱयात कमालीचे टेन्शन आहे.
सुरक्षेवर प्रदीर्घ चर्चा
रविवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांची कश्मीरातील सुरक्षेवर प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी गृहसचिव आणि इतर अधिकारीही उपस्थित होते. कश्मीरात एखादा मोठा हल्ला होऊ शकतो अशी माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर शहा आणि डोवल यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
मंत्रिमंडळाला अर्जंट कॉल
शहा आणि डोवल यांच्या भेटीनंतर तासाभरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावल्याचे जाहीर झाले. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक दर बुधवारी होते. मात्र यावेळी संसद सत्र सुरू होण्यापूर्वी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता बैठक होईल. त्यामुळे उद्याची बैठक नेमकी कशासाठी आणि त्यात काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. संसद अधिवेशनाचा कालावधी दोन दिवस वाढवण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात येते.
माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री राजकीय बैठक झाली. या बैठकीत पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती आणि काँग्रेस नेतेही उपस्थित होते.
राजकीय चर्चा जोरात
दहशतवादी हल्ल्याची भीती असली तरी जम्मू-कश्मीरसह देशभरात राजकीय चर्चा जोरात आहे. केंद्र सरकारने पहिल्यांदा दहा हजार अर्धसैनिकांची जादा कुमक कश्मीर खोऱयात तैनात केली. त्यानंतर अमरनाथ यात्रा तडकाफडकी रद्द करून यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना कश्मीरातून निघून जाण्याची सूचना केली. या सर्व प्रकरणाकडे आता राजकीय दृष्टीने पाहिले जात असून कश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे घटनेतील कलम 370 आणि 35 ए हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गृहमंत्री कश्मीर दौऱयावर
संसद अधिवेशन 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा हे 8 ते 10 ऑगस्टदरम्यान कश्मीर दौऱयावर जाणार आहेत.
ब्रिटन, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाचीही ऍडव्हायजरी
कश्मीरातील तणावस्थिती लक्षात घेऊन ब्रिटन, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियन सरकारनेसुद्धा शनिवारी ऍडव्हायजरी जाहीर केली आणि कश्मीरातून निघून येण्याच्या किंवा तेथे न जाण्याच्या सूचना आपापल्या नागरिकांना दिल्या आहेत.
इरफान पठाणलाही माघारी पाठवले
जम्मू-कश्मीर क्रिकेट संघाचा प्रशिक्षक इरफान पठाणलाही कश्मीरातून घरी परतावे लागले आहे. इरफान श्रीनगरमध्ये क्रिकेट प्रशिक्षणवर्ग घेत असून जिल्हा खेळाडूंची निवड करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत सामनेही खेळवले जाणार होते.
एअर इंडियाची भाडेकपात
खासगी विमान कंपन्यांनी पाचपट भाडे वाढवलेले असताना एअर इंडियाने मात्र भाडेकपात केली आहे. 15 ऑगस्टपर्यंत श्रीनगर-दिल्ली मार्गावर फक्त 6715 रुपये भाडे आकारले जाईल असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.



























































