
बुलडोझरमुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकार मोठ्या चर्चेत आहे. आता या बुलडोझरबाबत एक अजब प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये फर्निचरच्या थकबाकीची मागणी केल्याने उपविभागीय अधिकाऱ्याने व्यावसायिकाच्या दुकानावर थेट बुलडोझर घातला. यात घराची एक भिंतही पडली. या व्यावसायिकाने अधिकाऱ्याकडे 2.68 लाख रुपयांची फर्निचरची थकबाकी मागितली होती. आता या प्रकरणाचा आयुक्तांच्या सूचनेवरून तपास सुरू झाला असून संबंधित अधिकाऱ्याकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
बिलारी येथील स्टेशन रोड श्योंदरा हाऊस येथे राहणाऱ्या जाहिद अहमद यांचे घराजवळच आशीर्वाद फर्निचर या नावाने फर्निचर शोरूम आहे. जानेवारी महिन्यात उपविभागीय अधिकारी बेड, सोफा, टेबल आणि खुर्ची पाहण्यासाठी त्यांच्या शोरूममध्ये आले. यावेळी त्यांनी 1.48 लाख रुपयांचे फर्निचर खरेदी केले. त्यांच्या निवासस्थानी फर्निचर पाठवल्यानंतर त्यांना बिलही पाठवण्यात आले. यानंतर, 3 जुलै रोजी ते पुन्हा दुकानात आले आणि 1.19 लाख रुपयांचे फर्निचर खरेदी केले. त्यांच्या सांगण्यावरून, 5 जुलै रोजी ते फर्निचर हरदोई येथील डेप्युटी जेलरची मुलगी अलका वर्मा यांच्या घरी पोहोचवण्यात आले. मात्र या फर्निचरचे बिल घेऊन ते एसडीएमकडे गेले असता त्यांनी व्यावसायिकाला दुकान उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली.
याबाबत व्यावसायिकाने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रारीच्या एका दिवसानंतर एक शिपाई त्यांच्या घरी आला. त्याने धमकी देत गप्प बस, नाहीतर तुझा नाश होईल असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच व्यावसायिकाला घर पाडण्याची नोटीस मिळाली. १२ जुलै रोजी सायंकाळी तहसीलदारांनी व्यावसायिकाचे घर पाडण्यासाठी बुलडोझर पाठवला आणि एक भिंतही पाडली.
याबाबत व्यावसायिकाने आयुक्त अंजनेय कुमार सिंह आणि डीएम शैलेंद्र कुमार सिंह यांच्याकडे तक्रार केली. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून आयुक्तांनी डीएमला चौकशीचे निर्देश दिले. आयुक्त अंजनेय कुमार सिंह म्हणाले की, तक्रार पुराव्यासह आली असल्याने या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तपासात जे काही तथ्य समोर येईल त्याआधारे कारवाई केली जाईल. त्याचवेळी एसडीएम बिलारी घनश्याम वर्मा म्हणाले की, एडीएम प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे.




























































