
सुप्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीला जालना जिल्ह्यातील परतूर शहरात अपघाच झाला आहे. शहरातील साईनाथ कॉर्नरवर ही घटना बुधवारी 13 एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे.
परतूर तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असतांना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्त्याक्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला. एमएच 12 टीवाय 1744 या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघात स्थळावरून इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे पोहोचवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे कीर्तन नियोजित वेळेत पार पडले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.































































