भद्रकाली प्रोडक्शनच्या ‘संगीत देवबाभळी’ नाटकाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. नाटकाचा पहिला प्रयोग 22 डिसेंबर 2017 रोजी झाला. जवळपास पाच वर्षे मराठी मनावर गारुड केल्यानंतर ‘शेवटचे काही प्रयोग’ करीत असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र तेव्हापासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विविध भागांतील लोकांनी या नाटकाचे प्रयोग पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तुकाराम बीजपासून म्हणजे येत्या 9 मार्चपासून देवबाभळी दिंडी निघणार आहे. याअंतर्गत राज्यभरात जिथे देवबाभळीचे प्रयोग झाले नाहीत, तिथे प्रयोग होणार आहेत.
देवबाभळी दिंडीला नागपूर येथून प्रारंभ होईल. दौऱयाच्या पहिल्या पर्वात विदर्भ-मराठवाडा विभाग 9 ते 19 मार्च दरम्यान होईल. यात नागपूर, आनंदवन, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड, लातूर, बीड, संभाजीनगर, जळगाव, नाशिक असा हा धावा जनामनाचा दौरा असेल. त्यानंतर कोकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र अशा ठिकाणी नाटकाचे दौरे होतील.
निरोप घेतल्याशिवाय जाऊ नये
तुकाराम बीज ते आषाढी एकादशी आणि अखेरीस कार्तिक एकादशीच्या दिवशी आम्ही आमची ही दिंडी थांबवण्याचा निर्धार केला आहे. ‘शेवटचे काही प्रयोग’ असे जाहीर करीत असतांना आम्ही हा धावा आयोजित केला आहे. यानिमित्ताने त्या त्या शहरातले हे शेवटचे प्रयोगच असतील. निरोप घेतल्याशिवाय जाऊ नये म्हणतात. आम्ही प्रत्येक मराठी मनाची पायधूळ अबीर-बुक्क्यासारखी माथी लावत निरोप घेणार आहोत, असे भद्रकाली प्रोडक्शनचे प्रसाद कांबळी यांनी सांगितले.



























































