वरळी किल्ला प्रकाशझोताने उजळणार; पुरातत्व संचालनालय, महापालिका संयुक्तरित्या करणार विकास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपून या किल्ला व परिसराचा विकास करण्यात येईल. हा किल्ला व परिसर विद्युतीकरण आणि प्रकाश झोतांनी उजळून निघेल. पुरातत्व संचालनालय व महापालिकेच्या माध्यमातून हा विकास साधण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.

 वरळी किल्ला संवर्धन व परिसर विकासासंदर्भातील बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. राज्यासह मुंबईतील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून किल्ल्याचे जतन व संवर्धन करेल, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त हर्षद काळे, सहाय्यक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.

दहा वर्षे महापालिका काम पाहणार

वरळी किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व असून हा किल्ला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. या किल्ल्याच्या विकासासाठी पुढील 10 वर्षे मुंबई महापालिका सांस्कृतिक कार्य विभागासोबत काम करणार आहे, अशी माहिती सास्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.