
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना दहा दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.
24 ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. फडणवीस यांना मधुमेहाचा त्रास असल्यामुळे उपचार करताना अधिक काळजी घेतली, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले. मागच्या आठवडय़ात त्यांना रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन देण्यात आले. तसेच प्लाझ्मा थेरपीचेही डोस देण्यात आले. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर फडणवीस यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे डॉ. खोब्रागडे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे पुढील दहा दिवस त्यांच्या ‘सागर’ बंगल्यावर होम क्वारंटाईन राहणार आहेत.



























































