शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईत फडणवीस सरकारची ‘पाकीटमारी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओल्या दुष्काळाने 2017 मध्ये उद्ध्वस्त झालेल्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्कालीन फडणवीस सरकारने हेक्टरी 14 हजार रुपये जाहीर केले होते. मात्र पंचनाम्यातच घोळ घालणाऱया या सरकारने मदत देतानादेखील नुकसानभरपाईत ‘पाकीटमारी’ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तीन वर्षे उलटल्यानंतर मुरबाडमधील नुकसानग्रस्त शेतकऱयांना पैसे देण्यास प्रशासनाला मुहूर्त सापडला आहे. परंतु हेक्टरी केवळ 8 हजार 750 रुपये हातावर टेकवले जात असल्याने ही आमची कुचेष्टाच आहे, असा संताप व्यक्त केला जात आहे.

परतीच्या पावसाने या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातच हाहाकार उडवला आहे. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडणारे प्रशासन मदत देताना कागदी घोडे नाचवून आडवे जात होते. परंतु शिवसेनेने या मुद्यावर चांद्यापासून बांद्यापर्यंत आवाज उठवत विमा कंपन्यांना वठणीवर आणले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना हळूहळू दिलासा मिळत आहे. मात्र हे सगळे होत असतानाच मुरबाड तालुक्यातील शेतकऱयांना 2017 मधील नुकसानभरपाई देताना तत्कालीन फडणवीस सरकारने गंडवल्याचा आरोप येथील शेतकरी करत आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या या ओल्या दुष्काळात हातातोंडाचा घास हिरावलेल्या शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 14 हजार देण्याचे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात मदत देताना शेतकऱयांच्या खात्यावर फक्त 8 हजार 750 रुपये जमा केले जात असल्याने शेतकऱयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

प्रशासनाचा गोंधळी कारभार
ओल्या दुष्काळाचे पंचनामे करताना तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागाकडून करण्यात आले होते. मात्र हे कागदोपत्री सोपस्कार पार पाडताना सरकारी बाबूंनी योग्य ताळमेळ घातला नाही. त्यामुळे सरकारने नुकसानभरपाईपोटी दिलेले जवळपास पावणेपाच कोटी रुपये तहसील कार्यालयाकडे तीन वर्षांपासून पडून होते. एका अधिकाऱयाने नाव न सांगण्याच्या अटीवरच यासंदर्भात माहिती देऊन प्रशासनाचा गोंधळी कारभार चव्हाटय़ावर आणला आहे.

संतापजनक.. पंचनाम्यांची फाईलच हरवली
मुरबाडमधील साखरे, पारगाव, धारगाव व किसळ या गावातील नुकसानग्रस्त शेतीचेही 2017 मध्ये पंचनामे करण्यात आले होते. मात्र त्याची कागदपत्रे ग्रामसेवकाने हरवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. किसळचे माजी सरपंच जयवंत पडवळ, एकनाथ पवार, पद्माकर हलपतराव यांनी कृषी कार्यालयाकडे नुकसानभरपाईसंदर्भात चौकशी केली असता आमच्याकडे तुमची कागदपत्रेच आलेली नाहीत, अशी माहिती दिली. त्यानंतर या गावकऱयांनी ग्रामसेवक हर्षल गंगे यांना विचारणा केली असता कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगत त्यांनी हात वर केले.