
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत किनारपट्टीलगत मोठ्या प्रमाणात मासळी खरेदी-विक्रीचा व्यवसाय होतो. परंतु परजिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांमधून मासळीचे घाण पाणी रस्त्यावर सांडत असल्याने देवगड वाड्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
याप्रकरणी नगरपंचायतीने त्वरित लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. देवगड बंदरावरून मोठ्या प्रमाणात परजिल्ह्यात विक्रीसाठी मच्छी देण्यात येते परंतु देवगड बंदर ते जामसंडे खाकशी तिठ्यापर्यंत संपूर्ण मच्छीचे दुर्गंधीयुक्त पाणी गाडीतून रस्त्यावर सोडून देत असल्यामुळे रस्त्यावर पूर्णता दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
पाठीमागे असलेल्या वाहनचालकांच्या अंगावर देखील हे दुर्गंधीयुक्त पाणी उडते. तसेच हे पाणी रस्त्यावर सांडल्याने छोटे-मोठे अपघात देखील होत आहेत. हे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडत असल्यामुळे नगरपंचायतीच्या सभागृहात देखील नगरसेवकांनी हा प्रश्न उपस्थित करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली होती.
तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखील तक्रार करून देखील त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संबंधित नागरिकांकडून केला जात आहे. आता तरी नगरपंचायत याकडे लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मासे विक्री करण्यासाठी वाहनातून जात असले तरी घाण पाणी रस्त्यावर सोडत असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असताना देवगड जामसंडे नगरपंचायत क्षेत्रात हा प्रकार चालू असून त्याकडे संबंधित विभाग गांभीर्याने लक्ष देईल का ?


























































