देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभू विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभू यांनी भाजपाच्या प्रणाली माने यांचा 9 विरुध्द 8 मतांनी पराभव केला आणि नगराध्यक्षपदी साक्षी प्रभू विराजमान झाल्या आहेत. तर उपनगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये महाविकास आघाडीच्या मिताली सावंत यांनी भाजपाच्या अरुणा पाटकर यांचा 9 विरुध्द 8 मतांनी पराभव करत उपनगराध्यक्षपदी मिताली सावंत विराजमान झाल्या आहेत.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पिठासन अधिकारी उपेंद्र तांबोरे यांच्या उपस्थितीत झाली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्यावतीने साक्षी प्रभू तर भाजपाच्यावतीने प्रणाली माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे 8 व राष्ट्रवादीचे 1 उमेदवार अशी महाविकास आघाडी असल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीला पुर्ण बहुमत होते. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकिमध्ये प्रभू यांनी 9 विरुध्द 8 मतांनी माने यांचा पराभव केला तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या मिताली सावंत यांनी भाजपाच्या अरुणा पाटकर यांचा 9 विरुध्द 8 मतांनी पराभव केला आहे.

देवगड-जामसंडे नगरपंचायतीवरती शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकला आहे. शिवसेनेचे नगरसेवक बुवा ऊर्फ निवृत्ती तारी,संतोष तारी,नितिन बांदेकर,विशाल मांजरेकर,रोहन खेडेकर,मनिषा घाडी,साक्षी प्रभू,तेजस मामघाडी तर राष्ट्रवादीच्या मिताली सावंत व भाजपाच्या प्रणाली माने,अरुणा पाटकर,तन्वी चांदोस्कर,शरद ठुकरुल,स्वरा कावले,रुचाली पाटकर,मनिषा जामसंडेकर,आदया गुमास्ते असे नवीन नगरसेवक आहेत. यामध्ये शिवसेना भाजपाचे 8-8 तर राष्ट्रवादीच्या 1 असे पक्षीय बलाबल आहे.

नवनियुक्त नगराध्यक्ष साक्षी प्रभू म्हणाल्या की, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा विकास करतेवेळी सर्व जनतेला विश्वासात घेत या नगराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास नक्कीच सार्थकी लावत जनतेच्या मनातील विकास यापुढे केला जाणार आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीला सर्वात मोठी समस्या पाणीटंचाईची आहे. हा पाणी प्रश्न सर्व प्रथम सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेले पाणी प्रश्नाचे आश्वासन पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष निवडीवेळी खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.