वाडा घरफोडी प्रकरणी तिन्ही संशयित आरोपी देवगड पोलिसांच्या ताब्यात! 19 जूनपर्यंत पोलीस कस्टडी

वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयित चोरट्यांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले. तसेच तिसऱ्या आरोपीलाही देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रणव राजन नारिग्रेंकर (26, मूळ राहणार इळये पाटथर, सध्या रा. जुने डोंबिवली), हरीश दिलीप आचरेकर (19, मूळ रा. वाडा, आचरेकरवाडी. सध्या राहणार वापी गुजरात), महेश गणपत आचरेकर (41 रा. वाडा ,आचरेकर वाडी. सध्या रा. विरार) अशी या तीन संशयीतांची नावे आहेत. संशयिताना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संशयित आरोपींनी घराचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम दागिने चोरले. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर देवगड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण,श्र्वान पथक ,ठसे तज्ञ विभागाच्या पथकानेही तपासाला सुरुवात केली. या घटनेत एकूण 5 लाख 55 हजारांची चोरी झाल्याचे माहिती तक्रारदार वैशाली घाडी यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध देवगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयित चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. या चोरी प्रकरणातील प्रणव राजन नारिग्रेंकर, हरीश दिलीप आचरेकर तसेच तिसरा संशयित आरोपी महेश गणपत आचरेकर यातील दोन संशयितांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले. तर तिसऱ्या आरोपीला शुक्रवारी मुंबई येथून ताब्यात घेतले.