
सामना प्रतिनिधी, नागपूर
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. भटकंतीने व्यवसाय करणाऱ्या समाजाच्या पुनर्वसनासाठी राज्य शासन योजना तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य भारत भालके यांनी मुद्दा उपस्थित केला होता. धुळ्यातल्या साक्री तालुक्यात मुले पळवणारी टोळी समजून पाचजणांची जमावाने हत्या केली होती यावर भालके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, राईनपाडा घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन राज्य शासन करेल.


























































