एकाग्रता… श्वासावर नियंत्रण!

95

>> वरद चव्हाण

नेमबाज राही सरनोबत. एक वेगळा खेळ. नेमबाजीच्या सरावासोबत शारीरिक तंदुरुस्तीही तितकीच महत्त्वाची!

नमस्कार, फिटनेस फ्रिक्स! व्यायाम चालू आहे ना? पावसाचा आनंद लुटताय ना? स्वतःच्या तब्येतीची काळजी घेताय ना? तुम्हाला एक सांगू का? जेव्हा मला विचारण्यात आलं की, ‘सामना’ या वृत्तपत्रात फिटनेसवर लेख लिहाल का? तेव्हा एक वेगळा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? असं म्हणून मी होकार दिला खरा, पण नंतर कोणावर लेख लिहू? कोणावरचे लिहिलेले लेख वाचून तुम्हाला व्यायामासाठी प्रेरणा मिळेल? असे बरेच प्रश्न होते. आपण सगळेच टीव्ही, फिल्म्समध्ये काम करणाऱया कलाकारांना फॉलो करतोच. एकावेळी वाटले की, फक्त कलाकारांवरच लेख लिहू, पण जो उत्तम प्रतिसाद तुम्ही माझ्या प्रत्येक लेखात दिलात, माझ्या आत्मविश्वास खूप वाढला.

महाराष्ट्रात अनेक अशी रत्ने आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावर, मेहनतीने आणि कुठल्याही ग्लॅमरचा आधार न घेता स्वतःच आणि महाराष्ट्राचं नाव मोठं केलंय. अशीच एक आपल्या महाराष्ट्राची कन्या म्हणजेच आपल्या कोल्हापूरची ऑलिम्पिकमध्ये आपल्या महाराष्ट्रातच नाही तर हिंदुस्थानचे नाव मोठं केलेली उत्कृष्ट नेमबाज राही जीवन सरनौबत! त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांची यादी जर मी लिहायला बसलो तर एक पान कमी पडेल. राही यांना शाळेमधील एनसीसीमध्ये शूट करण्याची संधी मिळाली होती. अर्थातच ते शूट ऑलिम्पिकच्या दर्जाचं नव्हतं. पण राही यांना स्वतःच्या जीवनाचं एक ध्येय मिळालं आणि त्यांनी नेमबाज होण्याचं ठरवलं. त्यांच्या या निर्णयाला घरातल्या लोकांनी विरोध केला. त्यांच्या आई-बाबांची इच्छा होती की, मुलीने सायन्स शिकावं, पण राहींना शूटिंगचे वेध लागले होते आणि त्याच बरोबर कला शाखेत शिकायचं होतं. आता मुलीची आवड आणि हट्टापायी त्यांच्या आई-वडिलांनी स्वतःचा विरोध नमता घेतला आणि राहीला त्यांना हवं ते आयुष्य जगण्याची परवानगी दिली आणि कोल्हापूरच्या अजित पाटीलसरांकडे त्यांनी शूटिंगचे धडे घ्यायला सुरुवात केली.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना की, नेमबाजांचा डाएट आणि व्यायामाशी काय संबंध? कारण त्यात काय आहे, एका जागी नुसतं उभं राहून नेम तर लावायचा आहे. नेमबाजांसाठी लक्ष केंद्रित करणं आणि एकाग्रता खूप महत्त्वाची असते असा गैरसमज असणारे बरेचजण आपल्याला आपल्या अवतीभवती मिळतील, पण या स्पर्धेसाठी व्यायाम अत्यंत महत्त्वाचा असतो. नेमबाजांचं त्यांच्या प्रत्येक स्नायूवर नियंत्रण असणं अत्यंत गरजेच असतं. एक साधा विचार करा, आपल्यातले किती जण 1 मिनिट तरी एका जागी कसलीही हालचाल न करता उभे राहू शकतात? नाही ना शक्य! अहो, पण नेमबाजांना अतिशय स्थिर उभं राहून, स्वतःच्या श्वासांवर नियंत्रण मिळून अचूक निशाणा साधायचा असतो. बऱयाच वेळा आऊटडोअर शूटिंग असतं. तेव्हा वाऱयाचा (हवेचा) प्रवाह लक्षात घेऊन स्वतःचं शरीर स्थिर ठेवणं आणि फायर करताना श्वास रोखणं यासाठी व्यायाम खूप उपयोगी पडतो. त्याचबरोबर हार्ट बीट्ससुद्धा 110-120 तर कधी कधी 150 च्या घरात असतात. अशा परिस्थितीतही मन शांत ठेवून निशाणा साधण्यासाठी व्यायामाचा आधार घ्यावाच लागतो. म्हणूनच त्या वेट ट्रेनिंग, योगा आणि पिलाटीजचा आधार घेतात. पिलाटीजमुळे कोअर स्ट्रेन्थ वाढते. त्याचबरोबर राहींना स्वतःच्या आहारावरसुद्धा खूप लक्ष्य द्यावं लागतं. अति जेवल्यामुळे श्वासावर असलेला कंट्रोल जातो. कारण आपलं शरीराचा ऑक्सिजन पचनक्रियेत वापरला जातो. फार खाल्ल्यामुळे श्वास पोटातून घेतला जात नाही. वर-वर घेतला जातो. म्हणून ट्रेनिंगच्या वेळेस किंवा स्पर्धा जवळ आल्यावर त्या शक्यतोवर शाकाहारी असतात व जास्तीत जास्त फळं खातात. ऑफसीझन मात्र त्या कोल्हापूरच्याच असल्यामुळे त्यांना मटणावर ताव मारायला खूप आवडतो.

ज्या दिवशी सामना असतो त्या दिवशी मात्र दिवसभर त्या फळांवर असतात. असं म्हणायला हरकत नाही. त्यांचा सामना तीन भागांमध्ये होतो. पहिला भाग सकाळी 8 ला सुरू होऊन 10-10.30 पर्यंत चालतो. अशा वेळेस सकाळी 6 ला उठून दूध किंवा एखादं फळ खातात. 10-10.30 ला एक हाफ झाल्यानंतर पुन्हा एक-दोन केळी.दुसरा हाफ अर्ध्या तासाचा असतो. तो साधारण 12-12.30 ला सुरू होऊन एकपर्यंत संपतो. तेव्हा पुन्हा एखादं सफरचंद, दही खाणं आणि फायनल हाफ जो 4-5 पर्यंत संपतो. तो झाल्यावर नीट जेवण इतकं कठीण रुटीन त्या फॉलो करतात. हा लेख वाचून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात येत असते की, वरवरून सोप्या दिसणाऱया गोष्टींसाठीसुद्धा किती परिश्रम आणि समर्पण असावं लागतं. सध्या बरसणाऱया पावसाप्रमाणेच राही महाराष्ट्रावर सुवर्ण पदकांचा पाऊस पाडेल अशी प्रार्थना करूया आणि तिच्या या जीवनशैलीतून व्यायामाची प्रेरणा घेऊया.

आपली प्रतिक्रिया द्या