कष्टाचे चीज झालं! मोफत प्रशिक्षणामुळे 153 तरुण पोलीस खात्यात भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

पोलीस हा समाजाचा मित्र आहे. त्यामुळे पोलिसाचेही समाजाप्रती कर्तव्य आहे. ही बाब हेरुन तरुणांना मार्गदर्शन देण्यासाठी बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दिगंबर कपाटे यांनी घेतलेल्या विनामूल्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीरातील 42 प्रशिक्षणार्थीना पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, सैन्य अशा विविध फोर्समध्ये यश संपादन करुन निवड झाली आहे. त्यामुळे तरुण वर्गामध्ये पोलीस विभागाप्रती आपुलकी व आदर निर्माण झाला आहे
.
पोलीस ठाणा बुलढाणा शहर अंतर्गत पोलीस नाईक दिगंबर कपाटे हे आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडून सन 2014 पासून निशुल्क पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये गोळाफेक, लांब उडी, रनिंग, पुलअप्स इत्यादी मैदानी चाचण्या रोज सकाळी 6 ते 8 व सायंकाळी 5 ते 6.30 वाजता पर्यंत पोलीस कवायत मैदानावर दर पंधरवाड्याला एक लेखी परीक्षा घेण्यात येते. यावर्षी असे एकूण 12 पेपर घेण्यात आले. त्यामध्ये तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून त्याची फलश्रृती म्हणून बुलढाणा पोलीस दलामध्ये 12 युवक व 3 युवती असे एकूण 15 व इतर जिल्ह्यामध्ये 25 असे एकूण 41 विद्यार्थी पोलीस दलात दाखल झाले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लागलेल्या 15 विद्यार्थ्यापैकी मोहन विश्राम सुसर हा बुलढाणा जिल्ह्यातून पहिला मेरीट आला हे विशेष.

सन 2015 मध्ये 17, 2016 मध्ये 41 व सन 2017 मध्ये 53 आणि 2018 मध्ये 42 असे एकूण 153 प्रशिक्षणार्थी तरुण-तरुणींना पोलीस नाईक दिगंबर कपाटे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे यश संपादन करता आले आहे. सन 2017 मध्ये यश संपादन केलेल्या 53 युवक-युवतींचा बुलढाणा पोलीस अधिक्षक यांचे हस्ते सत्कार करण्यात आला होता. या कामात कपाटे यांना अपर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी बाबाराव महामुनी, शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार सुनील जाधव, राखीव पोलीस निरिक्षक अशोक राठोड यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.