
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरातून जात असताना चालकाने जेवणासाठी सिमेंट भरलेला ट्रक उभा केला. अर्ध्या पाऊण तासाने तो परत आला तर तिथे ट्रक दिसला नाही. तातडीने याची माहिती आर्णी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून ट्रक कोणत्या दिशेने गेला याचा माग काढत दिग्रस मार्गावर शोध सुरू केला पाठलाग करून दिग्रस-मानोरा रस्त्यावर ट्रक पकडण्यात आला. दोन चोरटेही हाती लागले.अगदी सिने स्टाईल आणि थरारक पद्धतीने हा पाठलाग करण्यात आला.
अतुल प्रभाकर कंटेश्वर हा चालक ट्रकने सिमेंट घेऊन जात होता. त्याने रात्री शिवाशिष एजन्सीसमोर ट्रक उभा केला व तो जेवणासाठी निघून गेला. त्या कालावधीत चोरट्यांनी ट्रक लंपास केला. आर्णी ठाणेदार केशव ठाकरे यांनी ट्रकचा माग काढत दिग्रस मार्गाने वाहन हाकले. दिग्रस येथे असलेल्या आर्णी पोलीस कर्मचाऱ्यांनाही याची सूचना दिली. त्यांनीसुद्धा ट्रकचा शोध सुरू केला. मानोरा रोडवर पाठलाग करून ट्रक थांबविण्यात आला. चोरी करणारे देवमन किसन जाधव,अजित कैलास जाधव या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी तब्बल 35 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार केशव ठाकरे,अविनाश जाधव,योगेश गिरी,अरुण जाधव यांनी केली.आरोपी सराईत गुन्हेगार आहे याचा शोध घेणे सुरु आहे.त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.































































