दिलीपकुमार रुग्णालयात, श्वसनाचा त्रास; हिंदुजात उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रविवारी सकाळी त्यांना खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून पुढील दोन-तीन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

98 वर्षीय अभिनेते दिलीपकुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना त्यांच्या पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो म्हणाल्या, ‘दिलीपकुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना पी. डी. हिंदुजा नॉन कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. नितीन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीपकुमार यांच्या सगळ्या चाचण्या करण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ऑक्सिजन सपोर्टवर

दिलीपकुमार यांच्या फुप्फुसात पाणी साचल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. फुप्फुसात पाणी साचणं ही वयोमानानुसार उद्भवणारी समस्या असल्याने आम्हाला त्यांच्या कोविड टेस्टची आवश्यकता वाटली नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कधीपर्यंत रुग्णालयात ठेवले जाईल हे आताच सांगता येणार नाही, असे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

शरद पवार यांनी केली प्रकृतीची विचारपूस

दिलीपकुमार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदुजा रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. दिलीपकुमार हे लवकरात लवकर ठणठणीत बरे होवोत, अशी प्रार्थना करत असल्याचे शरद पवार यांनी ट्विटवर म्हटले आहे.