सच्चा सहकलाकार हरपला

>> दिलीप प्रभावळकर

ज्याची भीती होती तेच झालं. त्याच्या आजाराविषयी मला माहिती होतं. मला वाटलं होतं त्यातून तो बरा होईल, पुन्हा आम्ही भेटू. तो माझा खूप जवळचा मित्र होता. सख्खा आणि सच्चा सहकलाकार होता. त्याला अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला. आम्ही फार भाग्यवान आहोत की, आम्हाला लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय याचा त्रिवेणी संगम ‘बॅरिस्टर’ या नाटकाच्या माध्यमातून बघता आला. जयवंत दळवी यांचे लेखन, विजया मेहता यांचे दिग्दर्शन आणि विक्रम गोखले यांची अप्रतिम भूमिका म्हणजे आमच्यासाठी एक मोठा वस्तुपाठ होता. विक्रम हा नुसता अभिनेता नव्हता, ती एक अभिनयाची संस्था होती. विजय केंकरे यांच्या ‘अप्पा आणि बाप्पा’ या नाटकात मला विक्रमबरोबर काम करायची संधी मिळाली. त्याचा स्टेजवरील वावर, वाचिक अभिनयावरील हुकूमत, शिस्त, भाषा, उच्चार हे सगळं मी एक सहकलाकार म्हणून फार जवळून पाहिले आहे. अशा नटाबरोबर रंगमंचावर एकत्र काम करणे हा फार आनंददायी अनुभव होता. मराठी नाटय़सृष्टीत विक्रमपेक्षा चांगलं मराठी बोलणारा नट शोधून सापडणार नाही असे मला वाटते. तो आणि त्याचे वडील पुढील पिढीला प्रशिक्षण देण्यात पुढे असायचे. शिवाय सामाजिक बांधिलकी जपण्यातसुद्धा ते कायम तत्पर होते.

अभ्यासू नट

वयाच्या 15 व्या वर्षी मी पहिल्यांदा रंगभूमीवर त्यांच्यासोबत काम केले. ते प्रचंड अभ्यासूपणे काम करायचे. अभिनयासाठी ते एक आदर्श होते. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. अभिनय करताना त्यांचे डोळे फार बोलके असत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही खूप मोठी पोकळी आहे. ती जागा भरून निघणे कठीण आहे. आपल्या कारकाRर्दीत त्यांनी उत्तम भूमिका केल्या. एवढे मोठे अभिनेते असूनही त्यांच्यामध्ये कुठेही अहमपणाची भावना नव्हती.

चांगला मित्र गमावला

 विक्रम गोखलेंच्या निधनाची बातमी ऐकून खूप वाईट वाटले. आपला एक मित्र आता आपल्यात राहिलेला नाही. माझी आणि त्यांची पहिली भेट पुण्याला झाली. मी तेव्हा निवेदक म्हणून काम करत होते. त्यांचा स्वभाव, त्यांची काम करण्याची पद्धत नेहमीच मला भावली. त्यांची कामे मला खूप आवडली. असा अभिनेता पुन्हा पाहायला आता मिळणार नाही. एक-दोन चित्रपटांमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली.

…असा कलावंत होणे नाही

विक्रम मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो… असेन… तुझ्यासारखा कलावंत, माणूस होणे नाही.

आमच्यासाठी अभिनयाची शाळा 

आज आपण एक अद्वितीय अभिनेता आणि एक सहृदयी माणूस गमावला. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. विक्रम गोखले म्हणजे आमच्या पिढीसाठी अभिनयाची शाळाच होती. माझ्या करीअरमधील ‘पार्टनर’ मालिका तसेच ‘कळत नकळत’ आणि ‘वजीर’ सिनेमा या तीन उत्तम आणि गाजलेल्या कलाकृतींमध्ये मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या अनेक आठवणी कायम माझ्यासोबत असतील!

त्यांच्याकडून खूप काही शिकलो

विक्रम गोखले यांच्या जाण्यामुळे मला अतीव दुःख झाले आहे. ‘भूलभुलैया’, ‘मिशन मंगल’ यांसारख्या चित्रपटांत त्यांच्यासोबत काम करण्याची आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली. ओम शांती.

कलाक्षेत्राचं मोठं नुकसान

आपल्या चतुरस्र अभिनयाच्या दैवी देणगीने मराठी तसेच हिंदी रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीत आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने अतीव दुŠख झाले. त्यांच्या जाण्याने हिंदुस्थानी रंगभूमी व चित्रपट क्षेत्राचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली.