कचरा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा मनपा बरखास्त करू! – मुख्यमंत्र्यांची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

कचरा प्रश्न धुमसत ठेवण्यासाठी भाजपच जबाबदार असल्याचा आरोप होताच बिथरलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नागपूरला या प्रश्नावर बैठक घेतली. कचरा प्रश्न मार्गी लावा नसता मनपाच बरखास्त करू, अशी धमकीच यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन दिवसांत रोडमॅप तयार करण्याचे फर्मानही त्यांनी प्रशासनाला सोडले. या प्रश्नावर आता दिरंगाई खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाल्याची माहिती उपमहापौर विजय औताडे यांनी पत्रकारांना दिली.

संभाजीनगर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा रिचविण्यासाठी होत असलेल्या विरोधामुळे शहरात कचरा साठून राहत आहे. त्यातच पाऊस सुरू झाल्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी सुटली आहे. कचरा प्रश्नाची उकल करण्यात भाजपच अडथळा आणत असल्याचा थेट आरोप शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. कचराप्रश्नावरून भाजपची अब्रू चव्हाट्यावर येत असल्याचे पाहून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी कचरा नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर,  जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त डॉ. विनायक निपूण यांनाही तातडीने पाचारण करण्यात आले. आज झालेल्या बैठकीला आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, उपमहापौर विजय औताडे, भाजपचे गटनेते प्रमोद राठोड आदींची उपस्थिती होती.

अधिकाऱ्यांची झापाझापी
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची झापाझापी केली. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दोन दिवसात रोडमॅप तयार करा असे फर्मान त्यांनी सोडले. कचरा प्रश्न सोडवण्यात यापुढे दिरंगाई झाल्यास मनपा बरखास्त करू अशी धमकीच मुख्यमंत्र्यांनी दिली. कचरा व्यवस्थापनात कुचराई केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले.

मुख्यमंत्री चांगल्या भावनेतून बोलले असावेत-महापौर घोडेले
कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मनपा बरखास्त करू, अशी धमकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांना प्रतिक्रिया विचारली असता कचऱ्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा या चांगल्या भावनेतून मुख्यमंत्री बोलले असावेत, असे ते म्हणाले. संभाजीनगर मनपात शिवसेना-भाजपची सत्ता आहे. केवळ शिवसेनेचेच नगरसेवक बरखास्त करता येणार नाहीत असेही ते म्हणाले.