रेल्वे न्यायालयाच्या लोक अदालतीत 3766 प्रकरणांचा निपटारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या कल्याण लोहमार्ग न्यायालयात न्यायाधीश स्वयंम शैलेंद्र चोपडा यांच्या कोर्टात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. यात तब्बल 3 हजार 766 प्रकरणे निकाली काढली असून 15 लाख 58 हजार 400 रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले. त्यापैकी 6 लाख 10 हजार रुपये रेल्वेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.

रेल्वे न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले खटले तडजोडीने मार्गी लागावेत म्हणून सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार कल्याण लोहमार्ग न्यायालय येथे लोक अदालत पार पडली. ज्यामध्ये न्यायाधीश स्वयंम शैलेंद्र चोपडा यांच्या कोर्टात तीन हजार 766 प्रकरणे निकाली काढली असून 15 लाख 58 हजार 400 रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले. तसेच एकूण 72 पैद्यांना गुन्हा कबूल केल्याने सोडण्यात आले. या मोहिमेमध्ये रेल्वे सुरक्षा बल यांच्या 3 हजार 89 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यामध्ये 311 प्रकरणे रात्र न्यायालया अंतर्गत काढण्यात आली. एकूण 1 हजार 782 प्रकरणे व्ही.सी.द्वारे निकाली काढण्यात आली. तसेच टीसीकडून आलेल्या एकूण 244 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. 52 आरोपींना त्यांनी केलेल्या रेल्वे तिकिटांच्या अवैद्य व्यवसाय व रेल्वे मालमत्ता चोरी केल्या संदर्भात दंडात्मक करावाई करण्यात आली.