
सामना ऑनलाईन। टेक्सास
घटस्फोट, काडीमोड म्हणजे कायमची ताटातूट. या ताटातूटीमुळे काहीजण उद्धवस्त होतात. तर काहीजण सुटकेचा नि:श्वास सोडतात. पण अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय किंबर्ली सॅन्टलेबन या महिलेने घटस्फोटानंतर अजब पद्धतीने जल्लोष केला. घटस्फोट मंजूर झाल्यानंतर लग्नाच्या कटू आठवणी नकोत म्हणून तिने चक्क लग्नाच्या ड्रेसमध्ये स्फोटक भरली आणि ड्रेस उडवला. विशेष म्हणजे यावेळी तिचा पतीही तिच्यासोबत होता. तिच्या या आनंदात अनेकजण सहभागी झाले होते.
किंबर्लीचे लग्न 14 वर्षांपूर्वी झाले होते. पण त्यांच्यात सतत वाद होत असल्याने किंबर्लीने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला. अखेर 9 नोव्हेंबरला न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला. नको असलेल्या नात्यातून मुक्त झाल्याचा हा आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण असल्याने किंबर्लीने तो सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याचे ठरवले. त्यासाठी तिने घटस्फोट पार्टीचे आयोजन केले. जवळच्या मित्रमैत्रिणींना व पतीलाही तिने बोलावले. त्यानंतर केक कापला, मद्यसेवन, डान्स, खाण्यापिण्याची रेलचेल अशी फुल टू पार्टी सुरू असताना तिने लग्नाचा ड्रेस आणला. त्यात स्फोटकं भरली व तो ड्रेस एका बांबूवर अडकवला. त्यानंतर एका पिस्तुलातून तिने त्याच्यावर गोळ्या झाडल्या व स्फोट घडवून आणला. नंतर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. या स्फोटाचा आवाज 25 किलोमीटर दूर अंतरावरील लोकांनीही ऐकला.

























































