मनतरंग – विक्टिम कार्ड!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

‘माझ्या वाईट परिस्थितीला मी सोडून सगळे कारणीभूत आहेत.’ ही विचार प्रणाली जेव्हा व्यक्तीच्या समजाचा भाग बनते तेव्हा ती स्वतःभोवती स्वतःपुरता आणि स्वतःला सुरक्षित असा कोपरा (कम्फर्ट झोन) बनवते. त्याचबरोबर, समोर आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याऐवजी तो टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. आपले प्रयत्न असफल ठरत आहेत हे जाणवल्यावर परिस्थिती, इतर माणसे यांना वाईट ठरवून मोकळी होते. यालाच ‘विक्टिम कार्ड खेळणे’ असे म्हटले जाते. यामध्ये व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसत नाहीत. याउलट तिचा कल हा स्वतःवर दया दाखवण्याकडे राहतो.

“मला तुझ्यासोबत राहायचंच नाही. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली आहे. मी तुला आता सोडून जातेय…” सोनलचा (नाव बदलले आहे) आवाज भलताच वाढला होता. ती रागारागाने तिची बॅग भरत होती आणि त्याच वेळेस आपल्या नवऱ्याला… तुषारला (नाव बदलले आहे) ताकीदही देत होती…“मला कॉल किंवा व्हॉटसअॅप करण्याचा प्रयत्नही करू नकोस. कारण मी तुझा नंबर ब्लॉक करते आहे,” असं म्हणत तिने तुषारच्या समोरच त्याचा नंबर ब्लॉक केला आणि तरातरा घराबाहेर पडली. तुषार हतबल झाला होता. त्याला काय करावं हे कळतच नव्हतं. त्याने लगोलग सोनलच्या वडिलांना फोन करून घडलेल्या गोष्टीची कल्पना दिली. तसेच आपल्या आई-वडिलांनाही फोन करून घडलेली घटना सांगितली.

तणावपूर्ण शांततेत दोन दिवस गेले. दोन दिवसांनी सोनलचे आई-वडील तुषारच्या घरी आले होते. त्यांच्याकडे सोनलने तुषार तिच्याशी किती वाईट वागला, याचा पाढा वाचलेला होता. “तुम्हालाही असंच वाटतं का?” तुषारने तिच्या आईवडिलांना थेट प्रश्न केला. “नाही. आमची सोनल कशी आहे हे आम्हाला आधीपासूनच माहीत आहे. त्यामुळे आता पुढे कसा तोडगा काढायचा हेच विचारायला आम्ही तुमच्याकडे आलोय,” असं सोनलची आई म्हणाली. “मलाही आता आमच्या नात्याबद्दल विचार करायला थोडा वेळ हवा आहे” असं म्हणत तुषारने तात्पुरता विषय सोडवला, पण सोनलचा विषय काही त्याच्या डोक्यातून जात नव्हता.

तुषार आणि सोनलचा प्रेमविवाह होता. दोघंही एकाच कंपनीत नोकरीला होते. हुशार, आत्मविश्वास असलेली आणि बडबडी अशी सोनल त्याला काही दिवसांतच आवडू लागली आणि त्याने तिला लग्नाबद्दल विचारलं. तिलाही तुषारचा शांत, मितभाषी, इतरांची काळजी घेण्याचा स्वभाव आवडला होताच. घरच्यांची संमती मिळवल्यावर त्यांनी लग्न करत एकत्र संसाराला सुरुवात केली. दोघेही त्याच्या आई-वडिलांबरोबरच राहत होते.

सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. नंतर मात्र सोनलला त्यांच्याबरोबर राहणं म्हणजे ‘स्वतःची स्पेस गमावणं’ असं वाटू लागलं होतं. तिला तुषारबरोबर वेगळं राहायचं होतं. लाडाकोडात वाढलेल्या सोनलला कामांची सवय नव्हती. सासूबाईंनी काही कामं, विशेषत स्वयंपाकात तिला मदतीला बोलावल्यावर तिला ती बळजबरी वाटायला लागली. ती नाराज राहू लागली आणि वरचेवर माहेरी जाऊन राहू लागली. सगळ्यांशी तिने हळूहळू असहकार पुकारला. घरातल्यांबरोबर एकत्र राहणं, खाणं-पिणं, फिरायला जाणं या सगळ्या गोष्टी बंद केल्या. तिच्या अबोल्यामुळे घरात शीतयुद्धासारखं तणावात्मक वातावरण निर्माण झालं.

शेवटी सासू-सासऱ्यांच्या सल्ल्यानुसार ते दोघेही वेगळं राहू लागले. तरीही सोनल शांत झाली नाही. याउलट; तिची तुषारवर चिडचिड व्हायला लागली. घरात रोज तिचा जुने विषय काढून त्रागा सुरू झाला. सुरुवातीला तुषारने तिला समजून घेत शांत करण्याचा, त्याच्या आई-वडिलांची बाजूही (जी निर्मळ होती) पटवून देण्याचा प्रयत्न केलाही. मात्र “तुझ्या घरातल्या माणसांमुळे आज माझं नुकसान झालं. मला ऑफिसमधे प्रमोशन नाही मिळालं, माझा कॉन्फिडन्स गेला,” असं काहीसं ती बोलल्यामुळे त्याचाही पारा चढला आणि त्यानेही तिच्या सोबत अबोला धरला.

तुषारचा असा अबोला सोनलला अनपेक्षित होता. कारण प्रत्येक वेळी तो पडती बाजू घेत आलेला होता. मग तिने तिच्या आई-वडिलांना धारेवर धरलं, “तुम्ही सासरच्या लोकांना माझ्या लाईफ स्टाईलबद्दल काहीच सांगितलं नाहीत, त्यामुळेच मला त्यांनी त्रास दिला.” सोनलचं असं मनासारखी गोष्ट झाली नाही किंवा एखादी गोष्ट पटली नाही की आकांडतांडव करणं हे निश्चितच गंभीर बनत चाललं होतं. तिचा संसार धोक्यात आला होताच; पण त्याचबरोबर तिचं स्वतःचं मानसिक स्वास्थ्यही हरवत चाललं होतं.

‘मी गरीब, बिच्चारी आणि सगळंच जग वाईट’ किंवा ‘माझ्या वाईट परिस्थितीला मी सोडून सगळे कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळेच माझं नुकसान होतं’ ही विचार प्रणाली जेव्हा व्यक्तीच्या समजाचा भाग बनते तेव्हा ती स्वतःभोवती स्वतपुरता आणि स्वतला सुरक्षित असा कोपरा (कम्फर्ट झोन) बनवते. त्याचबरोबर, समोर आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याऐवजी तो टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. आपले प्रयत्न असफल ठरत आहेत हे जाणवल्यावर परिस्थिती, इतर माणसं यांना वाईट ठरवून मोकळी होते. यालाच ‘विक्टिम कार्ड खेळणं’ असं म्हटलं जातं. यामध्ये व्यक्तीला स्वतःमधील दोष दिसत नाहीत. याउलट तिचा कल हा स्वतवर दया दाखवण्याकडे राहतो. त्यामुळे ती परिस्थितीची कशी गुलाम झाली आणि कशी गांजून गेली याचं रसभरित वर्णन तिच्याकडून सतत ऐकायला मिळते. या व्यक्ती सतत दुसऱ्यांना दोष देत राहतात, इतरांचा राग-राग करत राहतात आणि त्यांना लागेल असं बोलत राहतात. अशा व्यक्तींना काही चांगलं दिसत नाहीच. उलट चांगली आणि पोषक परिस्थिती असली तरीही तिच्यात कमतरता शोधून त्या इतरांना जाणवून देतात. यामुळे अशा विक्टिम कार्ड खेळणाऱ्या व्यक्ती त्यांचे नातेसंबंध स्वतःहून बिघडवत असतात आणि त्याचं खापर त्या इतरांवर फोडत असतात.

तुषारला समुपदेशन सत्रांमध्ये या गोष्टी कळत होत्या. कारण सोनलच्या सतत दोष देण्याच्या स्वभावामुळे तोही दुखावला गेला होता. त्याची अजूनही द्विधा मन:स्थिती होती. सोनल समुपदेशन घेण्यास तयार नव्हती. तिला वाटत होते, तिच्यापेक्षा इतरांना (तिचे आई-वडील, तुषार) या सत्रांची गरज आहे. तिचेही आई-वडील सततच्या तिच्या टोचून बोलण्याला कंटाळले होतेच. त्यांनीही समुपदेशन सत्रांची मदत घेतली, ज्यामध्ये तिला कसं सांभाळता येईल यासंदर्भात त्यांनी सत्रांमध्ये चर्चा केली.

या वेळी त्यांना सोनल जे काही बोलेल ते वैयक्तिक पातळीवर न घेण्याविषयी सांगण्यात आलं. तसंच तिला जास्तीत जास्त व्यग्र कसं ठेवता येईल यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं. ऑफिसचं काम, शारीरिक व्यायाम, एखादे आवडीचे काम करणं असे काही पर्याय सुचवण्यात आले. तसंच, जर ती काही चुकीचं परस्परसंबंध किंवा पुन्हा स्वतःबद्दल विक्टिम कार्ड वापरत असेल तर तिला चांगल्या, पण खंबीर शब्दांत समज देण्याचा सल्ला दिला गेला. याउपरही जर ती पुन्हा तशीच वागत असेल तर तिला समुपदेशनास आणण्यासाठी प्रवृत्त करण्यास सांगण्यात आले. स्वतः तुषार, त्याचे कुटुंबीय आणि सोनलचे आई-वडील आता बरेच सावरले होते. तुषार आणि सोनल आज वेगवेगळेच राहत आहेत. मात्र दोघांच्या कुटुंबीयांमध्ये सुसंवाद असून दोन्ही परिवार दोघांमध्ये समेट घडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)

[email protected]