सुरांची सोनेरी पहाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

दिवाळी… दिव्यांचा उत्सव… अभ्यंगस्नान, पहाटे लवकर उठणे, फराळ करणे, देवळात जाणे, फटाक्यांची आतषबाजी… याबरोबर दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संगीत, नृत्य, वादन या कलांचा संगम असलेली ‘दिवाळी पहाट’… हीसुद्धा पूर्वापार सुरू असलेली परंपरा… भूपाळ्या, अभंग, भावगीतं, नाटय़संगीत… गाण्यांचे विविध प्रकार या कार्यक्रमातून रसिकांना पहाटेच्या वेळी ऐकायला मिळतात.

‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांविषयी ज्येष्ठ गायक पंडित उपेंद्र भट सांगतात, पौराणिक महत्त्व दिवाळी पहाट साजरी होण्याला आहे. बळीराजाच्या मागणीप्रमाणे सुसंपन्न , वैभवयुक्त राज्य या दिवसात साजरं होत असतं. आपल्या सणांनाही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.   पूर्वीच्या काळी पहाटे देवळांत काकड आरती होत असे. भजनं गायली जात असतं. दीपावलीच्या दिवसांत सर्वांना आनंदी ठेवणं आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणं या कृतींचं प्रतीक म्हणून आजही ‘दिवाळी पहाट’चे कार्यक्रम साजरे होतात.  आज दिवाळी पहाटला तरुण प्रेक्षकांची उपस्थितीही आवर्जून असते. बरीच युवा मंडळी शास्त्र्ााrय गायन शिकत. त्यामुळे तीही दिवाळी पहाटचं आयोजन करू लागली आहेत. सकाळच्या वेळी वेगवेगळ्या वयोगटातले रसिक या कार्यक्रमाला आवर्जून येतात. नव्या गायकांमुळे दिवाळी पहाट डिजिटल झाली आहे असेही ते म्हणाले. दिवाळीच्या दिवसांत भल्या पहाटे साजऱया होणाऱया दिवाळी पहाट मध्ये भूपाळी, अभंग प्राधान्याने गायले जातात. त्यानंतर रसिकांचं मनोरंजन व्हावं याकरिता भावगीत, नाटय़संगीत, नवी-जुनी सिनेगीतं, अशी गाणी गायली जातात. हिंदु संस्कृतीशी निगडीत कलेतलं सौंदर्य या कार्यक्रमांतून भक्कम होत असते. त्यासाठी कोणतंही गाणं ऐकलं तरी चालतं. खेळ, संगीत, नृत्य अशी आपल्याकडील प्रत्येक कला देशाचं वैभव सांगते. या कलांच्या माध्यमातूनच कलाकाराचं जीवन सुंदर होतं. आपले सण कलांच्या माध्यमातूनच वैभवसंपन्न होतात. सणांच्या माध्यमातून कलेचा आनंद घेण्याची संधी म्हणजेच ‘दिवाळी पहाट’. असे आपल्या देशातील कलेचे महत्त्व ते पटवून देतात.

‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम

  • आज सकाळी 6.30 वाजता. ‘रंगात रंगली दिवाळी’ कालिदास, मुलुंड. सहभाग – अभिनेत्री अलका कुबल आणि हर्षदा खानविलकर.
  • दिग्गज कलाकारांच्या गप्पांसोबत संगीतमय दिवाळी पहाट. आज सकाळी 6.30 वाजता. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे.
  • उद्या सकाळी 6.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे सभागृह, बोरिवली.
  • शनिवार, 8 नोव्हेंबर रोजी हिंदुस्थानी अभिजात संगीताची संपूर्ण दिवसीय मैफल. ‘प्रहर कॉन्सर्ट’. सकाळी 6.30 पासून सुरू.

नेहरू सेंटरमध्ये धारवाडचा आवाज

पंचम निषादची संकल्पना असलेल्या ‘व्हॉईसेस ऑफ धारवाड-सेंट ऑफ सॉईल’ या कार्यक्रमात धारवाड प्रांतातील कैवल्यकुमार गुरव, वेंकटेश कुमार, जयतीर्थ मेवुंडी आणि गणपती भट या हिंदुस्तानी गायकांची कला सादर केली जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी 10 नोव्हेंबर आणि रविवारी 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजल्यापासून वरळी येथील नेहरु सेंटर येथे रंगणार आहे. ओजस आधिया, श्रीधर मांडरे, मंदार पुराणिक, निरंजन लेले आणि सिद्धेश बिचोलकर हे या कार्यक्रमातील इतर सहकलाकार आहेत.