
कोरोनामुळे राज्यात सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांना केवळ पाचच दिवस दिवाळी सुट्टी देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने अखेर मागे घेतला आहे. या निर्णयाला शिक्षक संघटनांनी केलेल्या विरोधानंतर शिक्षण विभागाने 14 दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर केली आहे. 7 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत ही सुट्टी मिळणार असून यादरम्यान ऑनलाईन शाळा बंद राहणार आहेत.
कोरोनामुळे यंदा शाळांना गणेशोत्सवाची सुट्टीही देण्यात आली नाही त्यामुळे शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. यातच दिवाळीची सुट्टीदेखील 12 ते 16 नोव्हेंबर अशी केवळ पाच दिवस जाहीर करण्यात आली. गुरुवारी या सुट्टीचे परिपत्रक जारी झाले मात्र विविध शिक्षक संघटनांनी याचा विरोध केला. अखेर आज शुक्रवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून 14 दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर केली आहे.
काल 5 नोव्हेंबरच्या परीपत्रकानुसार आधी 12 ते 16 नोव्हेंबर अशी दिवाळी सुट्टी देण्यात आली होती. यात आता बदल करून उद्या 7 नोव्हेंबरपासून 14 दिवस म्हणजे 20 नोव्हेंबरपर्यत सुट्टी देण्यात आली आहे.


























































