
राजकीय पक्ष आणि नेत्यांनी त्यांच्या सार्वजनिक सभांमधील भाषणात दिव्यांगांना उद्देशून अपमानास्पद शब्दांचा वापर करू नये, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. दिव्यांगांप्रकरणी अशा शब्दांचा वापर केल्यास त्याची नोंद दिव्यांगांचा अपमान म्हणून घेतली जाईल, असा इशाराही निवडणूक आयोगाने दिला आहे.
राजकीय पक्षांनी, नेत्यांनी त्यांच्या मोहिमा, भाषणे तसेच आश्वासने, जाहीरनामा सोशल साईट्सच्या माध्यमातून दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी पावले उचलावीत, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे. राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांसाठी दिव्यांग प्रशिक्षण मॉडय़ुल्ड विकसित करावे तसेच दिव्यांगांना कार्यकर्त्यांच्या रूपाने तसेच पक्षाच्या सदस्यत्वाच्या रूपाने पक्षात सक्रिय करावे, असे आवाहनही निवडणूक आयोगाने केले आहे.
या शब्दांचा वापर नको
- मुका, मतिमंद, आंधळा, बहिरा, लंगडा अशा शब्दांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांना संबोधण्यासाठी आंधळेपणा, कमी दृष्टी, बहिरेपणा, गतिमंद अशा शब्दांचा वापर करता येईल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
- राजकीय पक्षांकडून दिव्यांगांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वेदेखील प्रसिद्ध केली आहेत.
- दिव्यांगांबद्दल अपमानास्पद शब्दांचा वापर केल्यास तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास संबंधित नेत्याला, कार्यकर्त्याला दिव्यांगांसाठीच्या अधिनियम 2016 च्या कलम 92 अंतर्गत पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो, याकडेही निवडणूक आयोगाने लक्ष वेधले आहे.
- दिव्यांगांप्रति भेदभाव ठेवणार नाही, लैंगिक समानता राखू तसेच त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊ असे राजकीय पक्षांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
























































