पराभव स्वीकारण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार; 7 कोटींपेक्षा जास्त मते मिळाल्याचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या जो बायडन यांचा विजय झाला आहे. बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य करण्यास ठाम नकार दिला असून निवडणुकीत आपल्याला 7 कोटींपेक्षा जास्त वैध मते मिळाल्याचा दावा केला आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून आपल्यला 7 कोटी 10 लाख वैध मते मिळाली आहेत. आतापर्यंत राष्ट्राध्यक्षाला मिळालेली ही सर्वाधिक मते आहेत. त्यामुळे निवडणुकीत आपलाच विजय झाला आहे. पर्यवेक्षकांना मतमोजणीच्या कक्षाच प्रवेश देण्यात आला नाही. तसेच जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात मेल इन बॅलेट पोहचवण्यात आले. त्यात गैरप्रकार झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. मतदानाची मुदत संपल्यावर आठ वाजेनंतर मेल इन बॅलेटद्वारे आलेल्या मतांचीही मोजणी करण्यात आली, ते अयोग्य असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

ट्रम्प आपला पराभव स्वीकारण्यास नकार दिला आहे. बायडन यांनी अयोग्य पद्धतीने राष्ट्राध्यक्षपदावर दावा करू नये. निवडणुकीत आपलाच विजय झाला आहे. त्यामुळे बायडेन या पदावर दावा करू शकत नाही. निवडणुकीचे निकाल लागले नसून आता खरी कायदेशीर लढाई सुरू झाल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी सलग तीन ट्विट केले. त्यात त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपण आघाडीवर होतो. त्यानंतर बायडन यांनी आघाडी कशी घेतली. प्रत्यक्ष म्हणजेच वैध मतांपैकी आपल्याला 7 कोटी 10 लाख मते मिळाली आहेत. मेल इन बॅलटची मोजणी सुरू झाल्यावर बायडन यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे यात घोटाळा झाल्याचे स्पष्ट असल्याचे ट्रम्प म्हणाले. सर्वच राज्यात आपल्याला असलेली आघाडी अचानक कमी कशी झाली, असा सवाल करत ट्रम्प यांनी कायदेशीर लढाई सुरू झाल्याचे म्हटले आहे.

बायडन अमिेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांना 273 इलेक्टोरल मते मिळाली असून ट्रम्प यांना 214 इलेक्टोरल मते मिळाली आहेत. या विजयाबाबत बायडन यांनी जनतेचे आभार मानले आहेत. जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेच्या जनतेने सत्याच्या बाजूने मतदान केले आहे, असे उपराष्ट्राध्यक्ष होणाऱ्या कमला हॅरीस यांनी म्हटले आहे.