
‘कोरोना’चा प्रसार हा माणसापासून माणसात होतो. पक्षी-प्राण्यांपासून माणसाला ‘कोरोना’ची लागण होत नाही. त्यामुळे चिकन-अंडी, मटण, मासे बिनधास्त खा असे आवाहन मुंबई पशुवैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी नागरिकांना आज केले. ‘कोरोना’बाबत नाहक पसरवल्या जाणाऱया अफवांवर विश्वास ठेवू नका, असेही ते म्हणाले.
‘कोरोना’बाबतच्या अफवांमुळे अनेक नागरिकांनी चिकन खाणे बंद केले आहे. त्यामुळे कोटय़वधीची उलाढाल असलेला पोल्ट्री व्यवसायही धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अजित रानडे यांनी अफवा आणि गैरसमजांचे निरसन मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केले. पक्षी-प्राण्यांपासून ‘कोरोना’ची लागण किंवा प्रसार झाल्याचे एकही उदाहरण नाही. चिकन-अंडी, मटण, मासे हे प्रोटीनचे सर्वोत्तम माध्यम आहे. मात्र सध्याच्या अफवांमुळे लोकांनी चिकन-अंडी खाणे बंद केल्याने नागरिक एका चांगल्या आहारापासून वंचित राहत असल्याचे ते म्हणाले.
कुक्कुट व्यवसायाचे एका महिन्यात 500 कोटी बुडाले
‘कोरोना’बाबतच्या अफवांमुळे सध्या कुक्कुटपालन व्यवसाय प्रचंड अडचणीत सापडला आहे. प्रतिकिलोला 65 ते 70 रुपये उत्पादन खर्च असलेले चिकन सध्या अनेक भागांत केवळ 20 ते 25 रुपयांना विकले जात आहे. मुंबईतही अनेक भागांत 40 ते 50 रुपयांना मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या अफवांमुळे एकाच महिन्यात महाराष्ट्रात कुक्कुटपालन क्षेत्राचे तब्बल 500 कोटींचे नुकसान झाल्याची माहितीही डॉ. रानडे यांनी दिली.
महाराष्ट्रात दररोज दीड कोटी अंडी विकली जातात, तर सुमारे साडेचार कोटी मांसल पक्षी विकले जातात. मात्र गेल्या महिन्यात प्रतिअंडी एक ते दीड रुपयाचे तर प्रतिकिलो चिकनचे सुमारे 50 रुपयांचे नुकसान होत आहे.
‘कोरोना’ व्हायरस साधारणतः 0 ते 5 अंश सेल्सियसला तग धरून प्रसार होतो. 30 अंश सेल्सियस तापमानाला तो तग धरू शकत नाही. शिवाय आगामी काळात वाढणारा उन्हाळा पाहता ‘कोरोना’चा आपल्या देशात प्रसार होणार नाही.
पालिकेच्या 1916 वर संपर्क करा
‘कोरोना’बाबत मुंबईकरांना कोणत्याही प्रकारची संशय-शंका असल्यास हेल्पलाइन – 1916 वर संपर्क करा, असे आवाहन पालिकेने केले आहे. शिवाय पालिकेचे ट्विटर ‘माय बीएमसी’वरदेखील पोस्ट करू शकता. ‘बीएमसी’ वेबसाइटवरदेखील ‘कोरोना’बाबत सर्व माहिती करून देण्यात आली आ
























































